Kolhapur Crime : ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ग्रोबझ मल्टीट्रेड कंपनीच्या लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील (Kolhapur ZP) बाप लेकाला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी बापू कोळी व त्यांचा मुलगा रजपूतवाडीचे ग्रामसेवक स्वप्निल शिवाजी कोळी (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांना शाहूपुरी पोलिसांनी आज (3 एप्रिल) अटक केली. पोलिसांनी यापूर्वीही या प्रकरणात अटकेची कारवाई केली असून आता कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांनाच अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.


ग्रोबझ ट्रेडिंग, ग्रोबझ वेल्फेअर आणि ग्रोबझ निधी या तीन कंपन्यामध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देऊ असे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी कंपनीच्या संचालकांविरोधात आहे दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 14 गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या कंपन्याशी निगडित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असल्याच्या कारणावरून सहायक लेखाधिकारी शिवाजी कोळी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागात येत नव्हते, अशी माहिती आहे. शाहूपुरी पोलिसांकडून कारवाई संदर्भातील अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आला आहे. 


प्रकरण नेमके काय?


कंपनीचे प्रमुख विश्वास निवृत्ती कोळी यांनी जानेवारी 2021 मध्ये शाहूपुरी चौथ्या गल्लीत कार्यालयाची स्थापना केली होती.  त्यांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखविले होते. 20 टक्क्यापर्यंत गुंतवणुकीवर व्याज देण्यात येईल, असाही दावा केला होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एजंटांची सुद्धा नेमणूक करण्यात आली होती. कंपनीने सांगितल्यानुसार एप्रिल 2022 पर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळत गेला. मात्र त्यानंतर आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारींचा ओघ वाढत गेला. गुंतवलेल्या पैशावरील परतावा बंद झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर संचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले. विश्वास कोळीसह अन्य काही जणांना अटक करण्यात आली. दोघा एजंटानाही ताब्यात घेण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या