Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात ड्रायपोर्ट उभारण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. विभागीय अधिकारी मधुकर व्हाटोरे यांच्या नेतृत्वात केंद्रीय पथकाने तालुक्यातील मजले, सावर्डे व नरंदे येथील जागांची पाहणी केली. तसेच त्यासाठी आवश्यक असणारी दळणवळणाची साधने, रेल्वे मार्ग आणि इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. या पाहणीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर पुढील कामाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमामध्ये हातकणंगले तालुक्यात ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या कामाला सुरुवात झाली आहे. 


यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले की, राज्यात होऊ घातलेल्या पाच ड्रायपोर्टपैकी एक हातकणंगलेमध्ये होणार आहे. प्रस्तावित ड्रायपोर्टमुळे जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू होईल. दळणवळण, औद्योगीकरणात वाढ होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकणातील कारखानदारी, शेती, फौंड्री, वस्त्रोद्योग, फळे, भाजीपाला साखर कारखानदारीला नवी दिशा मिळेल आणि परिसराचा कायापालट होईल. 


आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या धोरणानुसार गती कृती योजनेअंतर्गत ड्रायपोर्टच्या कामाला गती मिळेल. सोयी सुविधांच्या अभावामुळे निर्यातीवर मर्यादा येत आहेत. ड्रायफूट उभारणीमुळे तो प्रश्न निकाली निघून जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय निर्माण होईल. यावेळी केंद्रीय समितीचे एम. व्हाटोरे, आमदार प्रकाश आवाडे, तहसिलदार कल्पना ढवळे, प्रकाश दत्तवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, अमित कामत, झाकीर भालदार, प्रतापराव देशमुख, राकेश खोंद्रे, नगरसेवक राजू इंगवले, निशीकांत पाटील यांच्यासह अधिकारी व सावर्डे मजले नरंदे गावातील सरपंच,  ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पदाधिकारी  उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या