Kolhapur News : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे गेल्या सात दशकामध्ये प्रथमच बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. त्यामुळे निवडणूक खर्च वाचला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. 


अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 अर्ज माघारीचे आव्हान होते. सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर निमंत्रक आमदार राजेश पाटील यांनी अडते व्यापारी व हमाल-मापाडी हे दोन गट वगळून 15 उमेदवारांची नावे जाहीर केली. उर्वरित उमेदवारांनी माघार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.18 जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. पक्षनिहाय प्रतिनिधित्व भाजप आणि राष्ट्रवादीला चार, काँग्रेस तीन, जनता दल एक, शिवसेना शिंदे गट एक आणि शिवसेना ठाकरे गट एक असे आहे. 


जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात जागा बिनविरोध 


दरम्यान, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत सोसायटी महिला प्रतिनिधी गट, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गट, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, व्यापारी व अडते गट आणि हमाल तोलाई गटातील अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या गटाची निवडणूक बिनविरोध झाली. बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय आघाडीच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सोसायटी गटातील सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, भटक्या जाती व भटक्या जमाती आणि ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात 11 जागांसाठी 21 उमेदवार शिल्लक राहिल्याने निवडणूक होणार आहे. 


कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीतून ठाकरे गट बाहेर


दरम्यान, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kolhapur Agricultural Produce Market Committee) निवडणुकीतून शिवसेना सत्ताधारी आणि विरोधी पॅनेलमधूनही बाहेर पडला आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकातून याबाबत घोषणा केली आहे. कोल्हापूर बाजार समितीच्या विकास संस्था गटातील 11, ग्रामपंचायत गटातील चार, अडते व्यापारी गटातील दोन व हमाल, मापाडी गटातील एक अशा 18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, कोल्हापूर बाजार समितीसाठी 585 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व भटक्या विमुक्त गटात दुरंगी लढती होणार आहेत. अन्य गटात बहुरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या