कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू झालेल्या निर्णायक लढ्याला आता राज्यभरातून दिवसागणिक वाढता पाठिंबा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या समोरील अडचणी आता वाढत चालल्या आहेत. जालना येथील अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून एक प्रकारे चळवळ सुरू झाली आहे. याचे पडसाद आता कोल्हापूर जिल्ह्यामध्येही (Kolhapur News( उमटण्यास सुरुवात झाली आहे. 


कोल्हापुरात उद्यापासून साखळी उपोषण 


कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ काल (27 ऑक्टोबर) दोनदा अडवून जाब विचारण्यात आला. आता मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकामध्ये उद्या रविवारी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाकडून उद्या रविवारी 29 ऑक्टोबरपासून सकाळी शाहू महाराजांच्या पुतळ्याशेजारी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत त्याचबरोबर कायदेशीर बाबींची चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती बाबा इंदुलकर यांनी दिली आहे. 


तसेच मराठा आरक्षण निर्धार यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. दरम्यान, उद्याच्या उपोषणामध्ये बाबा इंदुलकर यांच्यासह बाबा पार्टे, दिलीप देसाई, विजय देवणे, रविकिरण इंगवले, अनिल घाटगे, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, अमर निंबाळकर, सतीश नलावडे, अमित अतिग्रे, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. 


जिल्ह्यातील 14 गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बंदी


दरम्यान, कोल्हापूरमध्येही राजकीय पुढाऱ्यांना आता प्रवेशबंदी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 14 गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. त्या गावांमध्ये जोवर मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात न येण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावोगावी असे अनेक फलक उभा राहून राज्यकर्त्यांचा निषेध करण्यात येत आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील पुढाऱ्यांना बंदी घातलेल्या गावांमध्ये राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे, चंदगड तालुक्यातील निठूर, शाहुवाडी तालुक्यातील रेठरे वारणा, राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे, कागल तालुक्यातील हळदवडे आणि एकोंडी, करवीर तालुक्यातील इस्पूर्ली, नंदगाव, चुये, येवती, हणबरवाडी, म्हाळुंगे, पाडळी खुर्द  या गावांचा समावेश आहे. 


कोल्हापुरात महिलांनी कोल्हापुरी पायताण दाखवले 


दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 'फसवे सरकार चले जाव' आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारला कोल्हापुरी पायताण देखील दाखवले. मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधण्यात आल्या, तर महिलांनी काळे झेंडे दाखवले.


इतर महत्वाच्या बातम्या