Kolhapur News : जोतिबाचे दर्शन करून किल्ले पन्हाळगडावर सहपरिवार गेले असता अवघ्या अडीच वर्षीय चिमुकल्याचा  कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर गाडीखाली सापडून भीषण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडावर घडली. आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या आजोबांकडे धावत असताना चिमुरडा गाडीखाली सापडला. इंद्रनील अरुण दबडे (वय 2 वर्ष) असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर कुटंबाने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. बुधवारी (19 एप्रिल) दुपारी तीन वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी गेले होते. यावेळी आईचा हात सोडून रस्ता ओलांडताना गाडीखाली इंद्रनील सापडल्याने जागीच ठार झाला. ही घटना पन्हाळा येथील तबक उद्यानासमोर घडली.


नेमका अपघात कसा घडला?


पन्हाळागडावर पर्यटनासाठी आलेल्या सहपरिवार दबडे कुटुंब चहा पिण्यासाठी तबक उद्यानासमोर थांबले होते. यावेळी  इंद्रनीलने आईचा हात सोडून रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. अरुण दबडे आणि त्यांचे कुटुंबीय जोतिबावरून पन्हाळा पाहण्यासाठी आले होते. सोबत त्यांचे आई-वडील  मित्रपरिवार होता. सज्जाकोटी पाहण्यासाठी निघाले असता तबक उद्यानसमोर चहाच्या टपरीवर थांबले होते. त्या ठिकाणी दबडे परिवाराचे फोटोसेशन सुरु होते. 


यादरम्यान इंद्रनीलने आपल्या आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे उभे असलेले आजोबांकडे धाव घेत असताना सुधीर कुमार हांडे (रा. करमाळा, जि. सोलापूर) याची सज्जाकोटीकडून येणारी कार (एमएच- 45-एएल 6203) भरधाव येत असताना इंद्रनील कारच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली आला. त्याचबरोबर गाडीचे मागील चाकही इंद्रनीलच्या डोक्यावरून गेले यामध्ये तो अत्यंत गंभीर जखमी झाला. यावेळी स्थानिकांच्या मदतीने इंद्रनीलला पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये येथे नेण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. यावेळी दबडे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.


इतर महत्वाच्या बातम्या