कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत असतानाच दुसऱ्या बाजूनेच समांतर असलेल्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुद्धा सुरू आहे. या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र, मोबदल्यावरून शेतकऱ्यांकडून विरोध सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील निमशिरगावमध्ये एका शेतकऱ्याने स्वतःच्या मालकीची पावणे तीन एकर जमीन जात असल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. चौपट दराने किंमत द्यावी किंवा महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अविनाश कडोले, असे त्यांचे नाव आहे.
माझ्या मालकीच्या जमीनीमधील पावणेतीन एकर जमीन जात असून केवळ 15 गुंठे शेत शिल्लक राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन संपादनामध्ये सुद्धा आता वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. अविनाशने भूमीहिन होणार असल्याचे म्हणत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महामार्ग रद्द करा किंवा बाजारभावाच्या चौपट चौपट दर द्यावा अशी मागणी करत अंगावर राॅकेलचा कॅन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजूला असलेल्या लोकांनी वेळीच आवरल्याने मोठा अनर्थ टळला.
जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर; राजू शेट्टींचा इशारा
दरम्यान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गाच्या मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरु आहे. महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीस चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी
भूमि अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्यावत कागदपत्रे न तपासता तसेच संबधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता जुन्या कागदपत्राच्या माध्यमातून मोजणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चीती नसून वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदरच्या भुसंपादनामध्ये संपादित केल्या जाणाऱ्या जमीनींना राज्य शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून रत्नागिरी ते नागपूर या 945 किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास 907 किलोमीटरचे संपूर्ण भुसंपादन हे चौपटीने झालेले आहे. यामुळे याच मार्गावरील चोकाक ते अंकली हा 38 किलोमीटरच्या रस्त्यासाठी चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या