कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये बेधुंदपणे कार चालवून तीन मोटरसायकली उडवल्याची धक्कादायक घटना घडली. जमावाने कारचालक तरुणाला पकडून बेदम चोप दिला. तसेच चार चाकी कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दुकानाच्या दारात बसण्यास विरोध केल्याच्या रागातून तीन दुचाकी उडवल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर हुपरीमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. काल रात्री ही घटना घडली. तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडले


दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याच्या कारने दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ओम सुनील भालेराव असे त्याचे नाव आहे. अन्य तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघातानंतर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्पष्टीकरण देताना त्यांचा पुतण्या मयूर मोहिते हा अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला नसल्याचा दावा केला. घटनेवेळी आपल्या पुतण्याने कोणत्याही प्रकारचे नशेचे सेवन केले नसल्याचा दावाही केला. 


स्थानिक लोकांचा आमदाराच्या पुतण्यावर आरोप 


पुण्यातील पोर्श दुर्घटनेनंतर पुण्यातून दुसरा अपघात समोर आला आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने त्यांच्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. घटना घडली त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदाराचा पुतण्या दारूच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दारूच्या नशेत त्याने दुचाकीस्वारांना धडक दिली. मयूर मोहिते पाटील यांच्या वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. तो गाडीतून उतरला नाही. घटना घडली त्यावेळी मयूर मोहिते पाटील हे पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होते. ते विरुद्ध दिशेने गाडी चालवत होते. यादरम्यान त्यांच्या कारने दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कारला धडक दिल्याने दुचाकी काही फूट दूर जाऊन तरुण रस्त्याच्या कडेला पडला. त्यामुळे 19 वर्षीय ओम भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला.


इतर महत्वाच्या बातम्या