Kolhapur Municipal Corporation Corruption: कोल्हापूर महापालिकेमध्ये बरबटलेला टक्केवारीचा खेळ महापालिकेच्या नोंदणीकृत कंत्राटदरानेच समोर आल्यानंतर सर्वसामान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. या संतापाविरोधात आज (28 जुलै) आपकडून नंबर महापालिकेच्या प्रांगणामध्ये नोटा उधळून भ्रष्ट महापालिकेच्या यंत्रणेचा निषेध करण्यात आला. यावेळी आपकडून करण्यात आलेले बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत होते.
प्रशासकांनी नेमलेल्या चौकशी समितीला विरोध
आप नेते संदीप देसाई म्हणाले की, कंत्राटदार वराळे यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची टक्केवारी समोर आणली. मात्र, प्रशासकांनी नेमलेल्या या चौकशी समितीला आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले. एका अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्याला साथ असते. त्यामुळे कोल्हापूर मनपा हद्दीतील नामांकित बिल्डर किंवा आर्किटेक्ट असोसिएशनची समिती नेमून टक्केवारीची चौकशी करावी. वराळे यांनी केलेलं कोणत्या पद्धतीचे आहे हा मुद्दा नसून त्यांनी धाडसाने टक्केवारी समोर आणली आहे. या टक्केवारीने विकासकामांची दुर्दशा होते, त्यामुळे प्रशासकांनी कडक कारवाई करावी आणि टक्केवारी बंद करावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.
'मी टक्केवारी खातोय', 'मला पैसे खायला आवडतात'
टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचरा पेट्यांना नोटा चारून, तसेच महापालिकेसमोर नोटा उधळून आम आदमी पार्टीने निषेध केला. 'मी टक्केवारी खातोय', 'मला पैसे खायला आवडतात', 'माझं पगारात भागत नाही' असे लिहिलेल्या कचरापेट्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. कोल्हापूर महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचे आरोप करत स्क्रिनशॉट सार्वजनिक केले आहेत. यामध्ये विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पवडी अकॉउंट्स विभागातील अधीक्षक, लेखापाल यांच्यापासून थेट शहर अभियंता, मुख्य लेखापाल ते अतिरिक्त आयुक्त या सर्वांना बिल काढण्यासाठी टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदाराने केला.
ज्यांच्यावर टक्केवारीचा आरोप त्यांचीच कंत्राटदाराविरोधात फिर्याद
दुसरीकडे, कोल्हापूर महापालिकेची ड्रेनेच कामात खोटी बिले सादर करून 72 लाख उचलून फसवणुकीचा आरोप केल्याचा ठपका ठेवत कोल्हापूर महापालिकेकडून श्रीप्रसाद वराळे विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद कोल्हापूर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनी दाखल केली आहे. मात्र यामधील विरोधाभास म्हणजे याच प्रज्ञा गायकवाड यांना टक्केवारीच्या रूपामध्ये 1 लाख वीस हजार रुपये दिल्याचा आरोप श्रीप्रसाद वराळेनं केला आहे. इतकेच नव्हे तर गुगल पेचा स्क्रीनशॉट सुद्धा प्रज्ञा गायकवाड यांना दिलेल्या टक्केवारीचा शेअर केला आहे. त्यामुळे ज्यांनी टक्केवारी घेतली त्याच या प्रकरणांमध्ये फिर्यादी असल्याने याची सुद्धा उलटसुलट चर्चा रंगली आहे. वराळेविरोधात ड्रेनेज कामात खोटी कागदपत्रे दाखल करणे, शहर, उपशहर अभियंतांची बनावट सही, शिक्के मारून मजकुरात खाडाखोड करून ही रक्कम आर्थिक फायद्यासाठी वापरून महापालिकेचे फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. ही फसवणूक एक ते 23 डिसेंबर 2024 च्या दरम्यान घडली असल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या