Kolhapur Municipal Corporation : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनला दिलं आहे. त्यामुळे राज्यभरातील महापालिकेतील कर्मचारी आजपासून (16 मार्च) राज्यव्यापी संपातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर मनपा कर्मचारी (Kolhapur Municipal Corporation) आजपासून कामावर रुजू होणार आहेत. 


मात्र ते काळ्याफिती लावून काम सुरु करतील, असे पत्र फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे आम्हीही कामावर रुजू होऊ, अशी माहिती कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुंद्रे, सरचिटणीस दिनकर आवळे, अजित तिवले यांनी दिली आहे.


कचरा उठावासाठी 351 खासगी कर्मचारी 


दुसरीकडे, कोल्हापूर महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने मनपा प्रशासनाकडून टिप्परसाठी, ड्रेनेज लाईनसाठी तसेच 81 प्रभागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे 351 असे खासगी एजन्सीकडून कर्मचारी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून कचरा उठावासह भागातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 


सध्या मनपाकडे 200 रोजंदारी कर्मचारी आहेत. प्रशासनाने कर्मचारी संघाला ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबतचे पत्र दिले होते, पण ते कामावर हजर झाले नसल्याने कचरा व सफाईचे काम दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिले. त्यामुळे कंत्राटी चालकांकडून टिप्परमधून कचरा उठावाचा प्रयत्न झाला. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पावरही टिप्परमधून कचरा काढण्यासाठी 10 कंत्राटी कर्मचारी नेमले होते. रोजंदार कर्मचारी कामावर आले नसल्याने प्रशासनाने खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेण्याचे नियोजन केले आहे. त्यात 169 टिप्परसोबत 169 सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


81 प्रभागांमध्ये रस्ता तसेच गटार सफाईसाठी प्रत्येक प्रभागात 2 असे 162 कर्मचारी घेतले जाणार आहेत. तर ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यासाठी आणि जेट मशीन चालवण्यासाठीही 20 कर्मचारी घेतले जाणार आहेत. याशिवाय कचरा उठाव गतीने करण्यासाठी दोन जेसीबी आणि चार डंपर भाड्याने घेण्यात येणार आहेत. आजपासून ही यंत्रणा राबवण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांकडून शिस्तभंग कारवाईचा इशारा


दरम्यान, राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी 48 तासांत कामावर हजर न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी नोटीस जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांनी दिली आहे. सर्वसामान्य लोकांची कामे प्रलंबित राहत आहेत. लोकांची मोठी कुचंबणा होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर हजर राहण्याची नोटीस दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या