Continues below advertisement

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून एकत्र लढण्याचं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं आहे. तसेच बंडखोरी टाळण्यासाठी प्रत्येक पक्षाने काय काळजी घ्यावी याची रणनीतीही ठरली आहे. महायुतीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

कोणत्याही परिस्थितीत यावेळी महापालिकेत सत्ता आणायची असा चंग महायुतीच्या नेत्यांनी बांधल्याचं दिसतंय. जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री प्रकाश आबिटकर , वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यामध्ये संयुक्त बैठक पार पडली.

Continues below advertisement

बंडखोरी टाळण्यासाठी काळजी

कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रच लढणार आहे. तसेच तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची एक उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून सक्षम उमेदवाराची चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी टाळण्यासाठी तीनही नेत्यांनी काळजी घ्यावी असा निर्णय झाला आहे.

कोल्हापुरात महायुतीत कोणाला किती जागा?

कोल्हापूर मनपासाठी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. हा फॉर्म्युला स्थानिक पातळीवर ठरला असून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे आता लक्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एकूण 20 वर्ड निश्चित झाले आहेत, तर 81 नगरसेवक असेल. पहिल्या 19 वॉर्डमध्ये प्रत्येकी चार तर 20 व्या क्रमांकाच्या वर्डमध्ये पाच नगरसेवक असतील.

माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरुच

काही दिवसापूर्वी काँग्रेसला शिवसेनेकडून आणखी एक हादरा देण्यात आला. काँग्रेसच्या माजी महापौर सई खराडे यांनी आपल्या मुलासह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटामध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.

महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फॉर्म्युला ठरला

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फॉर्म्युला ठरला असून तिन्ही पक्ष एकत्रित लढतील असे चित्र आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील यांच्यावर प्रचाराची धुरा असणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. महायुतीकडून राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रचाराची धुरा असणा आहे.

ही बातमी वाचा: