कोल्हापूर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला अखेर जाग आली आहे. कोल्हापूर शहरात अनाधिकृतपणे लावलेले होर्डिंग काढण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केलं आहे. मुंबईतील दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं विनापरवाना उभा केलेलं होर्डिंगच्या मालकांना  नोटीस पाठवण्यात आलं आहे.  


20 ते 25 अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले


कोल्हापूर शहरातील 20 ते 25 अनाधिकृत होर्डिंग काढण्यात आले आहेत. काही होर्डिंग स्वतः मालकांनी काढून घेतले, तर काही होर्डिंग कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले आहेत. मात्र, यामुळे कोल्हापूर शहरात किती अनाधिकृत होर्डिंग लावली होती याचा अंदाज येत आहे. मात्र, घाटकोपरमधील घटनेनंतर उशिरा का असेना कोल्हापूर महानगरपालिकेला शहाणपण सुचलं अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. 


पुण्यात काळ आला होता, पण... 


दुसरीकडे घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत 17 जणांचा बळी गेला, तर 75 जखमी झाले आहेत. ही घटना अजूनही ताजी असतानाच पिंपरी- चिंचवड शहरातील मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला. वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले. यात चार दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालं. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळलं नाही.


इतर महत्वाच्या बातम्या