कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले (Hatkanangle Loksabha) लोकसभा उद्या 7 मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना सोडण्यासाठी तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रावरुन निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना परत आणण्यासाठी एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. 


कोल्हापूर विभागामार्फत मतदार संघनिहाय एकूण 435 बसेस पुरविण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन कोल्हापूर विभागाकडे 741 इतक्या बसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी 435 बसेस निवडणूक कामकाजासाठी पुरविण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गांवर वाहतूक विस्कळीत शक्यता आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन करुन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात आलं आहे. 


या मार्गांवर वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता 



  • कोल्हापूर आगार -  कोतोली, इचलकरंजी, कणकवली , रत्नागिरी व बेळगाव

  • संभाजीनगर आगार - बाजार भोगाव, भोगावती व हुपरी

  • इचलकरंजी आगार - नृसिंहवाडी, खिद्रापूर, कोल्हापूर  व मिरज

  • गारगोटी आगार -  कोल्हापूर व गडहिंग्लज

  • मलकापूर आगार - कोल्हापूर व कोकरुड

  • चंदगड आगार - कोवाड, राजगोळी, कोलीक, पारगड, तिलारी, कोल्हापूर व बेळगाव

  • कुरुंदवाड आगार - पुणे, सांगली, कागवाड, नृसिंहवाडी, इचलकरंजी व हुपरी

  • कागल आगार - पुणे, मुंबई, म्हसवड, जमखंडी, बिद्री, अर्जुनवाड, बोळावी, मिरज, इचलकरंजी, रंकाळा, निपाणी व सुळकूड

  • राधानगरी आगार - कोल्हापूर व निपाणी

  • गगनबावडा आगार - सातारा  व पुणे

  • आजरा आगार - गडहिंग्लज, आंबोली, चंदगड व बेळगाव


दरम्यान, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कोल्हापूर मतदारसंघात एकूण 19 लाख 36 हजार 403 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 2 हजार 156 मतदान केंद्र असणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात एकूण 18 लाख 14 हजार 277 मतदार आहेत. त्यासाठी 1 हजार 830 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण करण्यात आले आहेत. मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या