Kolhapur News: शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीमध्येही अजित पवार यांच्या बंडखोरीने राज्यात राजकीय उलथापालथींचा दुसरा अध्याय रंगला आहे. अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले असून त्यांच्यासोबत 8 आमदारांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता खातेवाटपासह पालकमंत्री सुद्धा बदलले जातील, यात शंका नाही. राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीनंतर खातेवाटप नव्याने होणार आहे. त्यामुळे आता पालकमंत्री सुद्धा बदलले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांना थेट पालकत्व नाही तिथे सुद्धा नवीन पालकमंत्री नेमले जातील, अशी शक्यता आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आणखी एक विस्तार करणार असल्याचे सुतोवाच अजित पवार यांनी काल केले आहेत. त्यामुळे आणखी कोणाला संधी मिळणार? याकडे लक्ष आहे.
दीपक केसरकरांविरोधात भाजपची नाराजी
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजित पवार भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. ईडीच्या रडावर असलेल्या हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांची सोबत केल्याने आता त्यांच्या कागल मतदारसंघासह जिल्ह्यातील सुद्धा राजकीय परिस्थिती बदलली आहे. आजच्या घडीला शिंदे गटाचे दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपने मोर्चा खोलला आहे. हे पालकमंत्री नव्हे, तर पर्यटनमंत्री असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नेमणुकीवरून भाजपने त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री बदलले जातील, असेच एकंदरीत चित्र आहे.
मुश्रीफ यांचे स्वप्न पूर्ण होणार?
मुश्रीफ यांचे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्न पूर्ण झालेलं नाही. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्याची जबाबदारी त्यांना मिळाली होती, तर कोल्हापूरचं पालकत्व पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या वाट्याला आल्यानंतर त्यांनी ते नंतर सतेज पाटील यांच्याकडे दिलं होतं. त्यामुळे हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री असूनही कोल्हापूरचे पालकमंत्री होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता ही कसर यावेळी भरून काढणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
चंद्रकांत पाटील ताकत लावणार की नाही?
त्यामुळे आता कोल्हापूरसाठी चंद्रकांत पाटील ताकत लावणार की नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार पुण्यासाठी जोर लावतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत पुण्याचे पालकत्व चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे. मात्र, चंद्रकांत पाटील हे आता पुण्यात कायम राहतील की कोल्हापूरमध्ये येतील याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपकडे एकही लोकनियुक्त नेता नाही. धनंजय महाडिक खासदार झाल्यानंतर कोल्हापूर भाजपमध्ये बळ आलं आहे. आता मुश्रीफ सोबत आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याचबरोबर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कोल्हापूरवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
हातकणंगलेची जागा मिळावी म्हणूनही भाजपने प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे आता ही सर्व स्पर्धा लक्षात घेता चंद्रकांत पाटील कोल्हापूर पालकत्व स्वीकारणार की हसन मुश्रीफ यांना संधी मिळणार याचे उत्तर काही दिवसांमध्येच मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :