Kolhapur Direct Pipeline : कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाईपलाईन योजनेतील (Direct Pipeline) आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. काळम्मावाडी (Kalammawadi) ते पुईखडी (Puikhadi) जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 53 किमी पाईपलाईन जोडून पूर्ण करण्यात आली आहे. काळम्मावाडी धरणात पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले होते. सध्या वीजवाहिनी आणि उपसा पंप बसवण्याचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण पाइपलाईनची चाचणी केली जाईल. जॅकवेलमध्ये पाणी पोहोचल्यानंतर पहिल्या 20 किमीची चाचणी करण्यात आली होती. 


काळम्मावाडी ते पुईखडी पाईपलाईन जोडून पूर्ण


भुयारी वीजवाहिनीसाठी खोदकाम करण्यात आलं आहे. वीजवाहिनीही लवकरच उपलब्ध होणार असल्याने ते कामही लवकर पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. उपसा पंप बसवण्याचे काम सुरू आहे. एका जॅकवेलवरील दोन पंपांसाठी तयारी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या जॅकवेलवरीलही पंप तसेच स्लॅबचे काम सुरू आहे.


योजनेतील सारी कामे ऑगस्ट अखेर पूर्ण होतील


दरम्यान, 9 जुलै रोजी थेट पाईपलाईनच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी काळम्मावाडी धरण परिसरात योजनेचं काम सुरु असलेल्या ठिकाणी पाहणी केली होती. त्यावेळी पाटील यांनी जॅकवेलवर पंप बसवण्यासह वीजवाहिनी, उर्वरित पाईपलाईनची स्वच्छता अशी थेट पाईपलाईन योजनेतील सारी कामे ऑगस्ट महिन्या अखेर पूर्ण होतील. त्यानंतर महिनाभर चाचणी घेतली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यामुळे दिवाळीपर्यंत पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


थेट पाईपलाईन योजनेतील आणखी एक टप्पा पूर्ण


दुसरीकडे, बिद्री साखर कारखान्याच्या आवारातून भूमीगत वीजवाहिनी नेण्याची परवानगी अध्यक्ष के. पी. पाटील आणि संचालक मंडळाने दिली आहे. त्यामुळे खोदकाम सुरू करण्यात आलं आहे. भूमिगत वाहिनीचे अंतर 4 किमी आहे. 23 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पंपिंग स्टेशनमधील पंप बसवण्याचे काम सुरू आहे. वीजवाहिनी टाकून झाल्यानंतर ते पंप सुरू होतील. पहिल्या 20 किमीची चाचणी झाल्याने आता पुढील पाईपची स्वच्छता केल्यानंतर महिनाअखेरपर्यंत पूर्ण योजनेची चाचणी घेतली जाऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :