Kolhapur: कोल्हापूरच्या नांदणीत लहान मुले पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावातील स्वरा शितल देसाई (वय आठ वर्षे) आपल्या लहान भावासह संध्याकाळी दूध आणायला निघाली होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या पाच अनोळखी व्यक्तींनी तिचे व भावाचे तोंड दाबून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी स्वराने धरलेल्या हाताचा जोरात चावा घेऊन आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी संबंधित या दोघांनाही सोडून अंधारातून पळ काढला. आवाज ऐकून लोक जमा झाले. तिने घडलेली घटना सांगितली. नंतर लोक संबंधित व्यक्तींचा शोध घेऊ लागले पण अंधाराचा फायदा घेऊन पळाले होते. संबंधित गुन्ह्याची नोंद शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात संध्याकाळी घडलेला प्रकार पाहून गावकरी चक्रावून गेले. गावातील आठ वर्षांची स्वरा शितल देसाई हिने अतिशय धाडस दाखवत स्वतःचे आणि आपल्या लहान भावाचे अपहरण टाळले. तिच्या चतुराईमुळे व धाडसामुळे गावात कौतुक होत असलं तरी अपहरणाच्या टोळ्या सक्रिय आहेत का? अशी भीतीही निर्माण झाली आहे.
नेमकं घडलं काय?
संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्वरा आपल्या सहा वर्षांच्या भावासोबत दूध आणण्यासाठी गावात निघाली होती. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर झडप घालत दोघांच्या तोंडावर हात ठेवून जबरदस्ती उचलून नेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर असूनही स्वराने प्रसंगावधान दाखवले. तिने अपहरणकर्त्यांच्या हाताला जोरात चावा घेतला आणि मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. स्वराच्या आरडाओरड्याने गावात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. हे पाहताच आरोपींनी घाईघाईत मुलांना सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली; मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांची चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिकांनाही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गावातील लहान मुलांवर झालेला हा अपहरणाचा प्रयत्न ऐकून नागरिक घाबरून गेले आहेत. पालक आता आपल्या मुलांबद्दल अधिक काळजी घेत आहेत. संध्याकाळी लहान मुले घराबाहेर जाऊ नयेत याची खबरदारी घेतली जात आहे.