कोल्हापूर : जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळजनक घटना घडली असून पॉक्सोतील आरोपी (Kolhapur POCSO Case) पोलिसांच्या बंदोबस्तातून फरार झाला आहे. आरोपीला मेडिकलसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले असता आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत पसार झाला. महत्त्वाचं म्हणजे ही घटना पाच ते सहा दिवसांपूर्वीची असून पोलिसांनी ती गोष्ट दाबून ठेवली होती. हा आरोपी अद्याप पोलिसांना सापडला नसून त्याचा शोध सुरूच आहे.

Kolhapur POCSO Case : अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

करवीर तालुक्यातील कुडित्रे फॅक्टरीजवळ असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रसंग घडला होता. त्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर संशयित आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकत पसार झाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना लघुशंकेसाठी जातो असे सांगून त्याने पोबारा केला आहे. पोलिसांच्या ताब्यातीलच संशयित आरोपी प्रसार झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर करवीर पोलीस ठाण्यात पीडितेच्या नातेवाईकांनी धाव घेतली होती. या घटनेनंतर गुरुवार ते शनिवारच्या दरम्यान शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील राहणारा  रोहित नंदीवाले या संशयित तरुणाला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस बंदोबस्तात आणले होते. 

Kolhapur POCSO Escaped : लघुशंकेला जातो सांगत पोबारा केला

वैद्यकीय तपासणीपूर्वी संशयित आरोपीने आपल्याला लघुशंका आली असल्याचे कारण देत पोलिसांपासून बाजू काढून घेतली. पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी आजूबाजूचा परिसर तपासला. संबंधित संस्थेत आरोपी मिळून आला नाही. गेल्या सहा दिवसांपासून करवीर पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र तरी देखील हा संशयित आरोपी मिळत नाही. 

दरम्यान या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. दरम्यान याबाबत करवीर पोलिसांशीसंपर्क साधला असता, लवकरच त्याला पकडले जाईल असं सांगण्यात आलं..