Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये (Kalamba Jail) शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणल्यानंतर तो फरार झाल्याची घटना घडली. आज (4 मार्च) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हातातून कैदी पळून गेल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. निवास होनमाने (रा. तासगाव, जि. सांगली) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. उपचारासाठी सीपीआरमध्ये आणलेल्या कैदी निवास पोलिसांची नजर चुकवून बेडीसह पळाला. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये  झाली होती. हातातून कैदी पळून गेल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.


नेमका प्रकार काय घडला?


पोलिसांनी (Kolhapur Police) कळंबा जेलमधील काही कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये आणले होते. यावेळी बेडी घातलेला कैदी निवास व्हनमानेला एका पोलिसासोबत उपचार कक्षात नेण्यात आले. उपचार करून झाल्यानंतर कैद्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिस कागदपत्रे घेण्यासाठी डॉक्टरांच्या कक्षात जाताच, व्हरांड्यात उभ्या असलेल्या निवास या कैद्याने धूम ठोकून पसार झाला. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कैदी पळाल्याचे ओरडून सांगितले. आरडाओरडा सुरु झाल्याने संबंधित पोलिसासह कर्मचारी कैद्याच्या दिशेने धावत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नजर चुकवून पीएम रूमच्या बाजूला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून दसरा चौकच्या दिशेने फरार झाला. कैदी पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सीपीआरमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे, पण अजून थांगपत्ता लागलेला नाही. 


कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरूच


अक्षरशः बदनाम झालेल्या कोल्हापुरातील (Kolhapur News) कळंबा जेलमध्येच (Kalamba Jail) गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. फेब्रुवारी महिन्यात एका भयंकर घटनेत एका कैद्याने दुसऱ्या कैद्याचा खून केला होता. सतपालसिंह जोगेंद्रसिंह कोठडा असे मयत कैद्याचे नाव आहे. गेल्याव वर्षी सप्टेंबर महिन्यात मोका कारवाईखाली अटकेत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. भरत घसघसे या कैद्याने आत्महत्या केली होती. त्याने खिडकीला कापडाची पट्टी बांधून आत्महत्या केली होती. जेलमध्येच कैद्यांचे खून, मारामारी, मोबाईल सापडणे, जेल अधिकाऱ्यांवर सहकारी महिलेवर अत्याचाराचे आरोपांमुळे एकंदरीत कळंबा जेलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या