Kolhapur News: कोल्हापूरचे मावळते पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ऊस वाहतूकदारांनी केलेल्या फसवणूक विरोधात शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 445 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड मजूर आणि टोळी मुकादमांकडून तब्बल 34 कोटींची फसवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 31 पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून फसवणुकीचा आकड आणि दाखल गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. विशेष शिबिराचे आयोजन केल्याने शेतकऱ्यांची इतक्या मोठ्या रक्कमेची फसवणूक झाल्याची माहिती उजेडात आली आहे.


एक आठवड्यांपासून तक्रारींचा ओघ  


18 मे रोजी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आवाहन केल्यानंतर तक्रारीचा ओघ सुरु झाला होता. यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 445 फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या फसवणुकीतून 34 कोटी 66 लाख 87 हजार 983 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन दिवाणी दाव्यांचाही समावेश आहे. धनादेश न वटलेल्यांची संख्या दहा आहे.  


‘स्वाभिमानी’च्या शिष्टमंडळाकडून निवेदन 


दुसरीकडे, जिल्ह्यात फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करणार असल्याची ग्वाही पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली होती. जिल्ह्यातील अनेक ऊस तोडणी कामगारांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या मुकादमांवर तातडीने कारवाई करणार आहे, असेही त्यांनी म्हटले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आठ दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची या तोडणी कामगार व मुकादमांनी संगनमताने सुमारे 33 कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.


संबंधित मुकादमांकडून थकीत रकमेच्या वसुलीसाठी गेले असता दमदाटी, मारहाण, शिवीगाळ करणे, सावकारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, महिलांना पुढे करून विनयभंग, अतिप्रसंग अशा केसेस करणाच्या धमक्यांमुळे वाहनधारक अक्षरशः हतबल झाले आहेत. अनेकजण यामुळे रस्त्यावर आले आहेत. स्वतःच्या जमिनी देखील विकलेल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, साखर आयुक्त, सहकार आयुक्त यांच्याकडे रितसर तक्रार दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पोलिस महासंचालकांना तातडीने तक्रार दाखल करून घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या