Kolhapur Crime : महिला सावकारासह चार खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून कोल्हापूर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव विनायक बाळासाहेब सुर्वे (वय 53, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे आहे.  

उमेश जाधव (रा. निवृत्ती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर), श्रीकांत माने  (रा. मंगळवार  पेठ) , बंटी महाडिक (जाधव पार्क, रामानंदनगर) व  मीनल पटेल यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.  पत्नी सिद्धी विनायक सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर मनपाच्या उद्यान विभागात कंत्राटी कर्मचारी असलेल्या विनायक जाधव यांनी आर्थिक अडचणींमुळे संशयित खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची त्यांनी व्याजासह परतफेड केली होती. मात्र, तरीही सावकारांकडून व्याज आणि मुद्दलसाठी विनायक यांच्यामागे सातत्याने तगादा लावला होता. त्यामुळे ते तणावाखाली होते.

त्यांनी याच वैतागातून राहत्या घरी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, पत्नी सिद्धी यांनी रोखले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करत विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना उपचासाठी सीपीआरला हलवण्यात आले. सोमवारी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या