Kolhapur city will be expanded : "मी निस्वार्थी आहे, आता हद्दवाढ होणार हे अटळ आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे", अशी माहिती कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहराला लागून असलेली उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांना आयुक्त नोटीस पाठवून ठराव मागवून घेतील. कोल्हापूर शहराबरोबर या गावांचा देखील आम्हाला विकास करायचा आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे.आमची भूमिका देखील हीच आहे की कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ व्हावी. हद्दवाढीमुळे कोल्हापूर शहराचा विकास होणार आहे, हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. राजकीय भूमिकेला आम्ही भीक घालणार नाही, ग्रामीण भागातील नागरिकांशी आम्ही चर्चा करू, असंही राजेश क्षीरसागर यांनी नमूद केलं.
कोल्हापूर नगरपालिकेची निर्मिती 1942 साली झाली, तेव्हापासून शहराची हद्द आहे तशीच आहे. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हद्दवाढीला राजकीय विरोध असेल तर त्याला आम्ही भीक घालणार नाही. गेल्या अनेक वर्षात काँग्रेसने कोल्हापूरचा विकास केला नाही. पण ग्रामीण भागातील लोकाचा विरोध असेल त्यांना विश्वासात घेवू, असंही राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं.
पुढे बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, कारण काँग्रेसने कोल्हापूर शहराची अक्षरशः वाट लावली आहे. हद्दवाढ न झाल्याने कोल्हापूर महापालिकेची इमारत देखील होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं आहे की हद्दवाढ करा आणि मग इमारत बांधू. हद्दवाढ व्हावी ही माझी निस्वार्थी भूमिका आहे, पण माझ्यावर आरोप केला जातो. राजकीय हेतूने हे आरोप करता कामा नये, ग्रामीण भागातील नागरिक देखील आपलेच आहेत.
शहराला एकरूप झालेली गावं शहरात घ्या अशी मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे की याची प्रक्रिया सुरू करा. कोल्हापूर शहराचा विकास होत आहे, विकास झाला नाही असं कुणी म्हणू नये आरक्षण हे नैसर्गिकरित्या पडत असते, त्यात कुणाचा हस्तक्षेप कुणी करू शकत नाही,असंही क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मॉडेलिंग हा अपघात, माझ्यासोबतचा प्रँक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 90s चं सर्वात आवडतं गाणं कोणतं?