कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून त्याचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीही त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही समोर आलं.
कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली. आता या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. आता कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यात आलं आहे.
सर्किट बेंच आणि खंडपीठ यामध्ये फरक असून उच्च न्यायालयाचे दोन किंवा तीन न्यायाधीश हे सर्किट बेंचमध्ये असतात. सर्किट बेंच ही खंडपीठाची पूर्वपायरी आहे.
संभाजीराजेंची पोस्ट
दरम्यान, दिल्ली ते नागपूर असा प्रवास करताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे विमानात शेजारी होते. त्यावेळी सरन्यायाधीशांनी आपल्याला ही आनंदाची बातमी दिली. सरन्यायाधीश म्हणाले 'की, राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ… सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे' असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी कोल्हापुरातील सर्किट बेंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. वेळेसोबत पैशाचीही बचत त्यामुळे होणार आहे. आता कोल्हापुरातील सर्किट बेंचचे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.
ही बातमी वाचा: