Kolhapur Airport : कोल्हापूर-बंगळूर मार्गावर विमानसेवा 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनी (indigo airlines) या मार्गावर सेवा देणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे बंगळूरमधून हे विमान पुढे कोईमतूरला जाईल. त्यामुळे दक्षिणेकडे राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक शिक्षण आणि नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी चांगला पर्याय मिळाला आहे. इंडिगो कंपनीकडून (indigo airlines) सध्या कोल्हापुरातून तिरुपती अहमदाबाद आणि हैदराबाद या मार्गावर विमानसेवा पुरविण्यात येत आहे.


या कंपनीने आता बंगळूर मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावरील विमानसेवा बंद आहे. कोल्हापूर बंगळूर विमानसेवा पूर्ववत करण्यात येईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले होते. दरम्यान, बंगळूर आयटी  तर फाउंड्री आणि उद्योगांसाठी कोईमतूर प्रसिद्ध असल्याने कोल्हापुरातील उद्योजक नोकरदार विद्यार्थ्यांची वाहतुकीची चांगली सोय होणार आहे, अशी माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली.






कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेचा प्रत्यक्ष वापर सुरु


दुसरीकडे कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरु झाल्याने विमानतळ विकासाच्या प्रकियेतील मैलाचा टप्पा पार पडला आहे. 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा कार्यरत विमानतळावर कार्यरत झाली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या खासगी विमानाने सुरक्षित टेक ऑफ केल्याने कोल्हापूर विमानतळ 24x7 सेवेत असण्यावर शिक्कामोर्तब झाले. 


कोल्हापुरात उतरले 146 आसनी मोठे विमान


दरम्यान, विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच 22 नोव्हेंबर रोजी 146 आसनांचे मोठे विमान उतरले. मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूरविमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले. स्टार उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या उद्योगक्षेत्रातील कामानिमित्त हे मोठे विमान कोल्हापुरात आले होते. एमब्ररर ई195-ई2 प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान 146 आसनी आहे. त्यात प्रवासी नव्हते. साडेचारच्या सुमारास या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. त्यामुळे एअरबस सारखी विमाने कोल्हापुरात उतरण्यास आणि येथून उड्डाण करण्यास येथील धावपट्टी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते एम्ब्रेर लेगसी 650 या जेट इंजिन असलेल्या विमानाने आले होते. 


छत्रपती राजाराम महाराजांचे नाव विमानतळास लवकरच


दुसरीकडे विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याची ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला नवी दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले होते. येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिली.
राज्यातील विविध विमानतळांच्या प्रश्नी अध्यक्ष गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री शिंदे यांची कोल्हापूर दौऱ्यावेळी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी या प्रश्नासंदर्भात नवी दिल्ली येथे चेंबरच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठकीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नवी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयात भेट घेतली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या