Jyotiraditya Shinde In Kolhapur : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या लोकसभा प्रवास योजनातंर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde In kolhapur) उद्यापासून (23 मार्च) दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामधील गावात केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा प्रवास योजनेनुसार, ते तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मागील दौऱ्यात त्यांनी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यामध्ये विकासकामांचा आढावा घेतला होता.


ज्योतिरादित्य शिंदे यांचा असा असेल दोन दिवसांचा दौरा 


ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde In Kolhapur) यांचे उद्या सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते शिरोळकडे प्रयाण करतील. त्यानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता हुपरीमध्ये (ता. हातकणंगले) चांदी कारागिरांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटमधील कार्यक्रमास हजेरी लावतील. तेथील कार्यक्रम पार पाडल्यानंतर कुरुंदवाडमधील कार्यक्रमास उपस्थिती लावून रात्री कोल्हापुरात आगमन आणि मुक्काम असेल. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता मोटारीने जोतिबाला जाऊन मंदिराला भेट देतील. मंदिर दर्शन झाल्यानंतर पन्हाळा येथील कार्यक्रमास उपस्थितीत राहणार आहेत. त्यानंतर एका स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती लावून दुपारी दीड वाजता विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण करतील. 


पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची मुंबईत बैठक


दरम्यान, मुंबईत मंगळवारी (21 मार्च) पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची बैठक मुंबई भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न, लोकसभा निवडणूक याबद्दल चर्चा झाली. बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेश सदस्य उपस्थित होते. कोल्हापुरातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते. यावेळी बावनुकळे यांनी कोल्हापूर हद्दवाढ, पंचगंगा नदी प्रदूषण यासाठी राज्यासह केंद्राकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. 


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा भाजप कार्यकारिणीमध्ये बदलाची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांची तक्रार केल्याचे समजते. काही कार्यकर्त्यांकडून पदाधिकारी निवडीवरून सोशल मीडियात संभ्रम पसरवत असल्याचे सांगितले. या तक्रारीची दखल घेत संभ्रम कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या :