Jyotiraditya Shinde on Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीला तारीख पे तारीख सुरुच आहे. आता दसऱ्यापूर्वी इमारतीचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने जलदगतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी टर्मिनल इमारतीच्या कामाचा आढावा घेत सूचना केल्या. यापूर्वी मार्च 2023 मध्ये इमारत पूर्ण करण्याचे उदिष्ट होते. मात्र, इमारतीला तारीख पे तारीख सुरुच आहे. भविष्यात कोल्हापूर विमानतळावरुन अधिकाधिक विमान सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आतापर्यंत झालेल्या कामाचे शिंदे यांनी कौतुक केले. 61 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली.
ज्योतिरादित्य शिंदे काय म्हणाले?
कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचीती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा. विमानतळ टर्मिनल इमारतीचे प्रवेशद्वार हे दगडी बांधकामातून करा, येथील कमानींवर मशालीच्या प्रतिकृती ठेवा, ज्यामधून कोल्हापूरचा समृद्ध ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित होईल. इमारतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, प्रसिद्ध वस्तू, उत्पादने, कला, संस्कृती, उद्योग यांची छायाचित्रे, व्हिडीओ वॉल आदी बाबींचा समावेश याठिकाणी करा.
राजाराम महाराजांचा आकर्षक पुतळा बसवा
शिंदे पुढे म्हणाले की, प्रवेशद्वाराजवळ विस्तीर्ण बगीचा तयार करुन छत्रपती राजाराम महाराजांचा आकर्षक पुतळा बसवावा. आकर्षक विद्युत रोषणाई करावी. विमानतळ टर्मिनल परिसरात तयार करण्यात येणारी प्रशस्त बाग, छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा, पर्यटनस्थळांवर आधारित छायाचित्रे व व्हिडीओ वॉल आदी बाबींबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी चर्चा केली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक रमेश कुमार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रोजेक्ट प्रमुख प्रशांत वैद्य, समरजीतसिंह घाटगे, महेश जाधव, सत्यजित कदम, चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या