सातारा : कराडचे माजी नगराध्यक्ष, भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय जयवंतराव पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना बळ देण्यासाठी तुतारी फुंकल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. जयवंतराव पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्या पाठिंब्यासाठी बॅनर्स लावल्यानंतर त्यांनी तुतारी हाती घेतल्याचे स्पष्ट होत आहे. पाटील यांनी उमेदवार शशिकांत शिंदे भेटीला येण्यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली. 


शशिकांत शिंदे यांनी कराड दौऱ्यात जयवंतराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पाठिंबा दिल्याबद्दल पाटील यांचे आभार मानले. यावेळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते. सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  शशिकांत शिंदे रिंगणात आहेत. शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्यानंतर दोघांनी सुद्धा जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. 


अॅड. उंडाळकरांच्या ताकदीचा अंदाज आला : शशिकांत शिंदे  


दरम्यान, कराड दौऱ्यामध्येच रयत संघटनेनं घेतलेल्या प्रचारार्थ बोलताना आमदार  शशिकांत शिंदे यांनी अ‍ॅड. उदयसिंह उंडाळकर यांच्या ताकदीचा अंदाज आल्याची प्रतिक्रिया दिली. खासदार झाल्यानंतर रयत संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण करण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.


शशिकांत शिंदे म्हणाले की, निवडणुकीला सामोरे जाताना संकटे आणण्याचा प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातमी तुमच्यामागे उभा राहीन. मी उपकाराची जाणीव ठेवणारा आहे. कोणत्याही संकटाला घाबरत नाही, पण  गेल्या चार महिन्यापासुन जिल्ह्यातील काही लोकांनी माझ्याविरोधात षड्यंत्र सुरु केलं आहे. आवाज दाबण्याचे काम सुरु केलं आहे. मात्र, आवाज दाबला, तरी  विचार दाबू शकणार नाहीत. 


यावेळी बोलताना अ‍ॅड. उंडाळकर म्हणाले की शशिकांत शिंदे हे कऱ्हाडमधुन मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील. त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारी रयत संघटना आहे. या संघटनेला मोडकळीस आणण्याचे प्रयत्न 2009 पासुन सुरु झाले. त्यांना व्यक्तीगत अडचणीत आणण्याचे काम ज्यांनी केले तेच आज प्रतिगामी विचारधारेच्या लोकांबरोबर जावून काम करत आहेत. मात्र, संघटनेच्या ताकदीवर विलासकाकांनी ते प्रयत्न मोडून काढले. प्रतिगामी लोक जर तुमच्याबरोबर बसून काम करणार असतील तर संघटनेला पुढे जावून काहीतरी विचार करावा लागेल. काकांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेची पाठराखण केली. 


इतर महत्वाच्या बातम्या