Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरराज्य प्रकल्प असलेल्या दुधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या डाव कालवा 32 ते 76 किमीमधील मातीकाम व बांधकाम करण्याच्या कामामध्ये ठेकेदारास अदा  केलेल्या देयकामध्ये आर्थिक अनियमितता निदर्शनास आल्याने सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात लक्षवेधी मांडून कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधगंगा कालवे विभाग क्र.1 कार्यकारी अभियंता श्रीमती विनया बदामी यांच्या तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच चौकशी सुद्धा केली जाणार आहे. आबिटकर यांनी लक्षवेधी मांडता कारवाई होत नसल्याचा मुद्दा मांडल्यानंतर फडणवीस यांनी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तापी विकास महामंडळ, जळगाव यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. 


लक्षवेधीवर फडणवीस काय म्हणाले?


नवीन तांत्रिक सुधारणांना मान्यता न घेता 40 कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे दुधगंगा कालवे विभाग क्र.1 कार्यकारी अभियंता यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असून यासंदर्भात सखोल चौकशी केली जाईल. तसेच कंत्राटदार आणि इतर अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे? या सर्वांची तापी विकास महामंडळ, जळगाव यांच्या माध्यमातून त्रयस्थ पद्धतीने चौकशी केली जाईल व अहवाल एक महिन्यात सादर केला जाईल. 


काय आहे प्रकरण?


ठेकेदाराला 40 कोटी अदा करण्यात आल्यानंतर सदर प्रकरणी अनियमितता व ठेकेदारास अतिप्रदान केलेल्या देयकांची स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची मागणी प्रकाश आबिटकर यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे 3 डिसेंबर 2020 रोजी लेखी निवेदन केली होती. यानंतर यासंदर्भात चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिक्षक अभियंता गुण नियंत्रण दक्षता पथक, पुणे यांना देण्यात आले होते. पण, कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. पाठपुरावा करुनही माहितीही देण्यात आली नव्हती. 


त्यामुळे दूधगंगा डावा कालव्यावर 32 ते 76 किमीमधील मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याच्या कामांमध्ये ठेकेदारास अदा केलेल्या आर्थिक अनियमित्तेबद्दल आबिटकर यांनी 21 मार्च, 2023 रोजी लेखी पत्र देऊन सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे देयके चुकीच्या पध्दतीने अदा केल्या प्रकरणी सहभागी असलेल्या सर्व वरीष्ठ अधिकारी यांची चौकशी व्हावी, शासनाने दुधगंगा डावा कालवा 32 ते 76 किमीमधील मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याच्या कामामध्ये ठेकेदारास अदा केलेल्या देयकामधील आर्थिक अनियमिततेची चौकशी करुन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची होत असलेल्या मागणीसाठी तातडीने कार्यवाही व उपाययोजना करण्यासाठी आबिटकर यांनी लक्षवेधी मांडून मागणी केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या