Kolhapur : जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेला निधी 31 मार्च 2023 अखेरपर्यंत 100 टक्के खर्च करावा. संबंधित विभागांनी तात्काळ तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन मंजूर विकास कामावर हा निधी काटेकोरपणे खर्च करण्याचे नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत निधीर राहून जाईल, याबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. पालकमंत्र्यांनी यावेळी, महालक्ष्मी मंदिर परिसर, पंचगंगा घाट, रंकाळा तलाव व हेरिटेज स्ट्रीट विकासकामांचे प्रस्ताव सात दिवसात सादर करावेत, असेही सांगितले.
ज्या शासकीय यंत्रणांचा निधी खर्च होऊ शकत नाही अशा यंत्रणांनी सदरचा निधी तात्काळ नियोजन समितीला समर्पित करावा. जेणेकरून ज्या शासकीय यंत्रणा हा निधी खर्च करु शकतील त्यांना तो विकास कामासाठी देण्यात येईल. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी मंजूर असलेली विकास कामे त्वरित सुरु करावीत, असेही त्यांनी सांगितले. केसरकर पुढे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 चा 389 कोटींचा प्रारुप आराखडा तसेच अनुसूचित जाती उपायोजनेचा 116 कोटींच्या प्रारूप आराखड्यास समितीने मान्यता दिली आहे. सन 2022-23 ची सर्वसाधारण योजना 425 कोटी व अनुसूचित जाती उपायोजना,116 कोटीचा मंजूर असलेला निधी 31 मार्च पर्यंत खर्च करावा, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, पंचगंगा घाट परिसरात विकास कामे राबवणे, ओल्ड पॅलेस ते न्यू पॅलेस पर्यंतच्या रस्ता हेरिटेज स्ट्रीट म्हणून विकसित करणे व रंकाळा परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी पुढील सात दिवसात कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाला सादर करावेत, असे निर्देश केसरकर यांनी यावेळी दिले.
यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी पुढील सूचना व मागण्या समितीसमोर मांडल्या. इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 20 कोटींची मागणी, कोविड काळात तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे, नर्सेस भरती, लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, रस्ता दुरुस्तीची कामे, रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी, कोल्हापूर शहरात दोन-तीन अद्यावत उद्याने उभारणे, स्मशानभूमीचा प्रश्न, वाहतूक व्यवस्था व पर्यटनाच्या अनुषंगाने प्रश्न तसेच विविध विकासात्मक कामासाठी निधीची मागणी यावेळी लोकप्रतिनिधीं कडून करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या