कोल्हापूर : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज ( ता. 4) तब्बल 14 वर्षांनी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापुरतीलकसबा बावड्यामधील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळा राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात ते काय बोलणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. उद्या दुपारी दीड वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. यानंतर हॉटेल सयाजीमध्ये होणाऱ्या संविधान संवाद सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील. दरम्यान, मालवणमधील घटनेनंतर शिवाजी महाराज पुतळ्यांच्या अनावरणासाठी सर्व पक्ष काळजी घेताना दिसत आहेत.


बावड्यातील राहुल गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण होत असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच स्वागतासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अत्यंत बारकाईने अभ्यास करून धातूचा वापर करून पुतळा साकारण्यात आला आहे. पुतळा उभारणीत आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी अंत्यत बारकाईने लक्ष घालून काम पूर्णत्वाकडे नेलं आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्यसाठी आवाहन करण्यात आलं आहे. करवीर तालुक्यातील पाचगावमधील सचिन घारगे यांनी हा पुतळा साकारला आहे. संकल्पक विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आहेत. 


शिवरायांचा पुतळा आहे तरी कसा? 


बावड्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16 तैलचित्रांचा बारकाईने अभ्यास करून करण्यात आला आहे. हा पुतळा ब्रांझ धातूचा असून त्याचे वजन अंदाजे दोन टन आहे. पुतळ्याची उंची साधारणपणे 12 फूट असून चबुतऱ्यासह ही उंची 21 फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन चित्रांमध्ये डोईवर जिगा, कलगीतूरा या शिरोभूषण मंदिल आहे. कमरेला शेला-पटक्यासह कट्यार व पाठीवर ढाल आहे. उजव्या हातामध्ये पट्टा, डाव्या हातामध्ये धोप (तलवार), पायामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले चढाव आहेत. पुतळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व तत्कालीन चेहरा पट्टीचा अभ्यास करून त्या पद्धतीचा चेहरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. छत्रपतींच्या हातातील शस्त्रांवरील तसेच पेहरावावर कलाकुसर तंतोतंत करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्व ऐतिहासिक संदर्भांचा विचार करण्यात आला आहे. 


रायगडावरील नगारखान्याचा संदर्भ घेऊन भव्य प्रवेशद्वार व त्यावरील सर्व कला तंतोतंत साकारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. यामध्ये प्रवेशद्वार व त्यावरील कलाकुसर,दगडी कमानी वरील नक्षीकाम, शरब वगैरेचा प्रयत्न जश्याच्या तसा करण्यात आला आहे. दोन्ही बाजूला किल्ल्याच्या तटबंदी सदृश्य दगडी भिंत उभारण्यात आली आहे. मुख्य चबुतऱ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाच्या व हाताच्या प्रतिकृतीचा ठसा पूजनासाठी तयार करण्यात आला आहे. चबुतऱ्याभोवतीचे नक्षीकाम कोल्हापूरमधील भवानी मंडप, राजवाडा, रंकाळा या सर्वांचा अभ्यास करून उभा करण्यात आलेले आहे.  मुख्य पुतळ्यासमोर लहान आयलँडवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची राजमुद्रा बसवण्यात आली आहे. किल्ला सदृश्य भिंतीवर व चबुतऱ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  चौकामध्ये कायम स्वरूपी भगवा ध्वज स्तंभ उभा करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या