Kolhapur Rain Update : गेल्या तीन वर्षापासून पावसाचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात चालू मोसमात पावसाने मात्र, पाठशिवणीचा खेळ सुरु केला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र, गेल्या आठवडाभर पावसाने पुन्हा दडी मारल्याने भुईमुग, सोयाबिन पीकावर पुन्हा एकदा टांगती तलवार निर्माण झाली आहे.
जिल्ह्यासह शहरात गेल्या आठवडाभरापसून पावसाचा किरकोळ अपवाद थेंबही पडलेला नाही. उन्हाळाच्या झळाही बसू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यातही यावेळी पावसाने पाठ फिरवल्याने चिंता वाढली आहे.
धुवाँधार पाऊस कोसळणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात जून महिन्यात फक्त 29.62 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जुलै महिन्यातील दमदार पावसाने परिस्थिती काहीशी बदलली. दोन महिन्यांच्या सरासरीची तुलना केल्यास आतापर्यंत केवळ 62 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाने अशीच दडी मारल्यास पाण्याचे नियोजन करण्यास आतापासून सुरुवात करावी लागणार अशी चिन्हे आहेत.
कुंभी, कासारी धरणामधील विसर्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 धरणांपासून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामधील कुंभी, कासारी धरणामधील विसर्ग बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे राधानगरी धरणातून विसर्ग कमी करून तो 1 हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. कोदे आणि वारणा धरणातूनही विसर्ग कमी करण्यात आला आहे.