Aaditya Thackeray in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी शिवसेना फोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आता शिवसेनेला पुन्हा एकदा सावरण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 


या पार्श्वभूमीवर उद्या 1 ऑगस्टला सायंकाळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे कोल्हापुरात येत आहेत. ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असतील. उद्या सायंकाळी साडे सहा वाजता मिरजकर तिकटीला त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी, ते आगमन झाल्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेतील. त्याचबरोर शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले यांच्या कार्यालयाही भेट देणार आहेत. त्याचबरोबर युवा सेना पदाधिकारी मंजित माने यांनी तयार केलेल्या सेल्फी पाँईंटचे उद्घाटन करतील. हर्षल सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन होणार आहे. 


उद्या कोल्हापुरात मुक्काम केल्यानंतर ते मंगळवारी शिरोळ दौऱ्यावर जाणार आहेत. जयसिंगपूरमध्ये सकाळी सभा घेतल्यानंतर ते सातार दौऱ्यावर रवाना होती. 


जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड 


एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला अभूतपूर्व भगदाड पडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची बांधणी करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन खासदार असावेत हे नेहमीच बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झाले. मात्र, या स्वप्नाला अवघ्या अडीच वर्षांमध्ये सुरुंग लागला आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी केल्याने हे दोन्ही खासदार शिंदे गटाला मिळाले आहेत. 


त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक एका बाजूला आणि जिल्ह्यातील सैनिकांच्या जीवावर झालेले आमदार खासदार एका बाजूला असे सध्या एकंदरीत चित्र आहे त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आदित्य ठाकरे काय बोलतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या