Kolhapu News : तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या निर्बंधमुक्त शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून काटेकोर नियोजन सुरु आहे.
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांकडून नवरात्रोत्सव काळात सुरक्षेसह वाहतूक मार्गात बदल केले आहेत. शहरातील अनेक मार्गावर एकेरी वाहतूक तसेच अवजड वाहनांना वाढीव बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरामध्ये 11 ठिकाणांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल.
अवजड वाहनांना वाढीव बंदी
पोलिसांकडून शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना रात्री आठ ते सकाळी 10 यावेळेत अंबाबाई मंदिर परिसरात 5 ऑक्टोबरपर्यंत वाढीव बंदी घालण्यात आली आहे.
सीपीआर चौक, सोन्या मारुती चौक, तोरस्कर चौक, गायकवाड बंगला, गंगावेश, रंकाळा स्टँड, तटाकडील तालीम, तांबट कमान, जुना वाशी नाका, देवकर पाणंद पेट्रोल पंप चौक, इंदिरा सागर चौक, रेसकोर्स नाका, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा टॉकीज, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, दसरा चौकातून अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना रात्री 8 ते सकाळी 10 पर्यंत वाढीव बंदी केली आहे.
एकेरी मार्ग
दुसरीकडे महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी असेल. दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी हा मार्ग खुला असला, तरी गर्दी झाल्यास बंद करण्यात येईल. बिंदू चौक ते वणकुंद्रे भांडी दुकान ते पापाची तिकटी, भेंडे गल्ली रोड नेहमीप्रमाणे एकेरी राहील. केएमटी बसेस छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणार नाहीत.
केएमटीकडून दुर्गा पासचा प्रारंभ
दरम्यान, कोल्हापूरमध्ये दुर्गा दर्शनासाठी केएमटीकडून पास देण्यात येतो. या सेवेचाही प्रारंभ करण्यात आला आहे. शाहू मैदान पास वितरण केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. या पासमुळे अल्प किंमतीमध्ये दुर्गा दर्शनाचा लाभ शहरवासियांसह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना घेतो.
इतर महत्वाच्या बातम्या