Kolhapur Rain : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईसह, कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. एका रात्रीत पंचगंगेची पाणी पाचळी 7 फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर गेली आहे. त्यामुळं नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. 




 
सर्वच नद्या दुथडी भरुन वाहतायेत


कालपासून कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. या पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. कालच्या एका रात्री पंचगंगेची पाणी पातळी तब्बल 7 फुटांनी वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 24 फुटांचवर पोहोचली आहे. या पावसामुळं जिल्ह्यातले सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, काल दिवसभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सध्याही पावसाची संततधार सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील पश्चिमेकडचे जे तालुके आहेत, त्याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील सगळ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 2019 आणि 2021 कोल्हापुरात मोठा पूर आला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे. 




राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी


मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.