Raju Shetti on PM Kisan Yojana : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वारंवार सांगूनही त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे नियमितपणे 11 हप्ते जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी यापूर्वी सहा हप्ते परत करून अपात्र ठरवण्याची विनंती केली होती. मात्र,अजूनही त्यांच्या खात्यावर नियमित 11 हप्ते जमा झाले आहेत. माजी खासदार असल्याने धोरणानुसार अपात्र असूनही किसान सन्मान निधी खात्यावर जमा होत असल्याने शिरोळ तहसिलदार सौ. अपर्णा मोरे धुमाळ यांची भेट घेत पुन्हा अपात्र करण्यासाठी विनंती केली आहे. 


राजू शेट्टी यांनी अधिक माहिती देताना म्हटले आहे की, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा 2 हजार रुपयांचा अकरावा हप्ता 31 मे रोजी माझ्या खात्यात जमा झाला. मी लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे. याआधी मी स्वत: 6 हप्ते जमा झालेनंतर 12 हजार रूपयाचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून मला अपात्र करणेबाबत पत्र दिले होते, तरीही आज अखेर 11 हप्ते नियमित जमा झाले आहेत.


मी वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतक-यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुध्दा त्यांचे पैसे येत नाहीत, काय गौडबंगाल आहे कळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. 



 ई-केवायसी अपडेट करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 


दरम्यान, पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी अपडेट करणे बंधनकारक असून यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना  योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. 


पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरु असून याअतर्गंत लाभार्थ्यांची आधारकार्ड जोडणी करुन घेतली जाणार आहे. लाभार्थ्यांनी 'आपले सरकार' केंद्रांमार्फत अथवा पीएम किसान अॅपद्वारे ईकेवायसी प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या