कोल्हापूर : ईडीच्या रडारवर असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावरून मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील एका घटनेमुळे बचावले, नाहीतर आमच्याबरोबर शपथ घेतली असती, याबाबत लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आज कोल्हापुरात (Kolhapur News) माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. 


ते म्हणाले की, जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत ते आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्या सोबतच शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी काय आहे ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निष्ठांवत म्हणून ओळख राहिलेल्या मुश्रीफ ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अजित पवार गटात सामील झाले आहेत. पीएम मोदी यांनी नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, या टिकेला हसन मुश्रीफ यांनी मौन बाळगले. त्यांनी  कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारचा प्रयत्न


मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाच्या नागरिकांनी आज सकाळी माझी गाडी अडवली, पण मी त्यांचं समाधानकारक उत्तर दिलं आहे. न्यायालयात टिकणारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसल्यापासून सकल मराठा समाजाची (Maratha Reservation) ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. गावागावांत नेत्यांना प्रवेश बंदी होत आहे, कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माझीही गाडी अडवली होती. त्यांनी माझ्यासमोर मराठा आरक्षण मिळावं यासाठी भावना व्यक्त केल्या. मराठा आरक्षणाच्या मोर्चात आम्ही सहभाग घेतला होता, मराठा आंदोलनात आमचा नेहमी सहभाग असतो. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे अशी भावना पहिल्यापासून आमची आहे, आणि आजही आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत, परंतु ते टिकलं पाहिजे ही भावना आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर मार्ग निघून मराठा आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्न करत आहे आणि यावर लवकरच तोडगा निघेल. 


मराठा आरक्षणाबाबत मी भावना व्यक्त केल्यानंतर मराठा समन्वयक समाधानी झाले आहेत. शासन पातळीवर हा तिढा सोडवावा लागेल , मराठा आरक्षणाचं चक्रव्यूह आपल्याला भेदावं लागेल. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे त्यांनी आंदोलन कशा प्रकारे करावं हा त्यांचा प्रश्न आहे,  त्यामध्ये राजकारण सुद्धा असण्याची शक्यता आहे. परंतु, आरक्षण देणं महत्त्वाच आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या