Hasan Mushrif: ईडीच्या आरोपातून माझी निर्दोष मुक्तता झाल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर शरद पवार यांच्यासोबत असताना ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. कागलमधील निवासस्थानी पडलेल्या छाप्यामागे कोण असाही सवाल उपस्थित होत होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कारखाना उभा करताना मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी मुश्रीफ यांना अडचणीत आणले होते. मात्र, आता हसन मुश्रीफ यांनीच आपण निर्दोष सुटल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तेत आल्यावर नेमकं काय झालं? असा सवाल उपस्थित होत आहे.

Continues below advertisement

मुश्रीफ-घाटगे एकत्र येताच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप

दुसरीकडे, कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी एकत्र येताच कागलमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. कार्यकर्ते सुद्धा बुचखळ्यात पडले आहेत. या युतीमागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचेही बोलले जात आहे. या नवीन युतीवर शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी “ही विकासाची नव्हे तर प्रॉपर्टीची युती आहे” अशी टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली. त्यांच्या या आरोपांना हसन मुश्रीफ यांनीही काल तितक्याच जोरदार शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. 

Continues below advertisement

मंडलिकांनी बोलताना जपून बोलावे

संजय मंडलिकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, मंडलिकांनी बोलताना जपून बोलावे. “मी जर तोंड उघडले तर बात दूर दूर तक जायेगी,” असा थेट इशारा त्यांनी दिला. मंडलिक बेजबाबदारपणे आरोप करत असल्याचा आरोप करत त्यांनी लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्याशी स्वतःची तुलना करून घेऊ नये, असा टोला मारला. “स्व. सदाशिवराव मंडलिक कुठे आणि संजय मंडलिक कुठे?” असे म्हणत मुश्रीफांनी मंडलिकांच्या राजकीय परिपक्वतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.दरम्यान, संजय मंडलिक यांनी मुश्रीफ–घाटगे युतीवर आरोप केले होते की कागल तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली ही प्रत्यक्षात प्रॉपर्टी वाचवण्याची आणि राजकीय सुटका करून घेण्याची युती आहे. आमच्या उमेदवारांना दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला भाग पाडले जाऊ नये म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. “कोल्हापूरमध्ये जो एकाकी पडतो त्याच्या बाजूने जनता उभी राहते. कागलमध्येही माझ्या पाठीशी पूर्ण जनता आहे,” असा दावा संजय मंडलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे यांच्या या अनपेक्षित आघाडीमुळे अजूनही चर्चा सुरुच आहे. दोन्ही गटांची स्थानिक ताकद लक्षात घेता नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाकडे तर उपनगराध्यक्षपद घाटगे गटाकडे जाण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे कागल नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या