Hasan Mushrif : ईडीच्या (ED) छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. दाखल केलेल्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी 14 मार्च रोजी हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 27 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीचे निर्देश सत्र न्यायालयाला देण्यात आले आहेत. सध्या मुश्रीफांच्या तिन्ही मुलांसह त्यांच्या लेखापालाकडून दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरु आहे. त्यांच्यासोबतच हसन मुश्रीफांच्याही अर्जावर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोल्हापुरातील मुरगूडमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालायने 24 एप्रिलपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काल (23 मार्च) आणखी 25 शेतकऱ्यांकडून मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात
दरम्यान, आज चौथ्यांदा हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. फसवणुकीच्या प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी आज पुन्हा चौकशी होत आहे. यापूर्वी त्यांची तीनवेळा ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. मुश्रीफ यांनी चौकशीदरम्यान काही मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.
मुश्रीफांच्या समर्थनार्थ शेतकरी ईडी कार्यालयात
दरम्यान काल (23 मार्च) मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याकडून झालेल्या फसवणुकीबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी समर्थक शेतकरी थेट ईडी कार्यालयात पोहोचले. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि संजय चितारी यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे एक हजारहून शेतकरी यात सहभागी झाले होते. मुश्रीफ यांच्या विरोधात विवेक कुलकर्णी यांच्यासह 16 जणांनी मुरगुड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुश्रीफ समर्थक कारखान्याच्या सुमारे एक हजाराहून अधिक सभासद शेतकऱ्यांनी मुंबईच्या ईडी येथील कार्यालयावर धडक देत स्पष्टीकरण दिले.
महत्वाच्या इतर बातम्या :