ZP constituency: आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांची गणांची घोषणा झाली आहे. या निर्णयाने काही ठिकाणी आनंद झाला आहे, तर काही ठिकाणी इच्छुकांच्या तयारीवर पाणी फेरलं गेलं आहे. नव्या रचनेमध्ये करवीर तालुक्यामध्ये पाडळी खुर्द आणि कागल तालुक्यात बानगे या दोन नव्या जिल्हा परिषद मतदारसंघांची भर पडली आहे. आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द झाला आहे.
सिद्धनेर्लीत समावेश केल्यानं गावकऱ्यांची नाराजी
कोल्हापूर जिल्ह्यातील 68 गट आणि गणांची प्रारूप रचना जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. अनेक तालुक्यांमध्ये गावांची अदलाबदल मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 21 जुलैपर्यंत या प्रारूप रचनेवर हरकती घेता येणार आहे. दरम्यान, कागल तालुक्यातील बानगे जिल्हा परिषद गट नव्याने निर्माण झाला, असला तरी साडे सात हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या म्हाकवे गावाला बानगे जिल्हा परिषद गटातून वगळून सिद्धनेर्लीत समावेश केल्यानं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संतप्त गामस्थांनी निर्णयावर पुवर्विचार न झाल्यास आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. भौगोलिक दृष्ट्या सोयीस्कर नसलेल्या सिद्धनेर्ली मतदारसंघात समावेश केल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे.
कागल तालुक्यात सहावा बानगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ
दरम्यान, कागल तालुक्यात सहावा बानगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ निर्माण झाला आहे. मतदारसंघाची रचना करताना गावांची अदलाबदल झाली आहे. परंतु एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्यसंख्या वाढली आहे. दुसरीकडे, करवीरमध्ये सर्वाधिक 12 जिल्हा परिषद गट व 24 पंचायत समिती गणांची निर्मिती झालेली आहे. पाडळी खुर्द हा नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ निर्माण झाला आहे. तर पाडळी खुर्द आणि शिरोली दुमाला हे दोन नवीन गण तयार झाले आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येला प्राधान्य दिल्याने भौगोलिक रचनेकडे दुर्लक्ष झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या