Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली.


या कारवाईनंतर हसन मुश्रीफ आज प्रथमच कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरून (Hasan Mushrif ED Raid) तसेच किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यावं. अंबाबाईचे दर्शन घ्यावं आणि आम्ही केलेल्या कामांचा देखील आढावा घ्यावा. आमचा एकही कार्यकर्ता किरीट सोमय्या यांना अडवणार नाही. 


अधिकाऱ्यांवर दबाव, ते तरी काय करणार


ते पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांवर दबाव असतो त्यामुळे या छाप्यादरम्यान (Hasan Mushrif ED Raid) त्यांची कोणतीही चूक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही शांततेचं आवाहन केलं. आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. गेल्या पाच वर्षांपासून किरीट सोमय्या अशाच पद्धतीचे आरोप करत आहेत. मात्र, त्यामधून काहीही निष्पन्न झालेलं नाही. दरम्यान, सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत प्रेम करणाऱ्या जनतेचे देखील आभार हसन मुश्रीफ यांनी मानले.


हसन मुश्रीफांवरील आरोपांचं कोलकाता कनेक्शन काय? 


दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपांचं कोलकाता कनेक्शन एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी रुपये जमा केले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करून काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीनं केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या