Kirit Somaiya In Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये ईडी कारवाईवरुन (Hasan Mushrif ED Raid) खणाखणी सुरु असतानाच किरीट सोमय्या (kirit somaiya in kolhapur) यांनी कोल्हापूर दौरा केला. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. दरम्यान, यावेळी समरजिंतसिंह घाटगे आणि किरीट सोमय्या यांची शासकीय विश्रामगृहात भेट झाली. 


कागलच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी 


दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर बुधवारी ईडीने केलेल्या कारवाईनंतर कागल तालुक्यात राजकारण चांगलेच पेटले आहे. मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर राजकीय वैरी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी रंगल्या आहेत. ईडीच्या कारवाईनंतर अवघ्या पाच दिवसांत सोमय्या यांनी कोल्हापुरात येत मुश्रीफांवर पुन्हा हल्ला चढवला. 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ यांच्या खात्यात कसे जमा झाले? याची माहिती एकदा कोल्हापूरकरांना द्या, अशी मागणी केली. 


सोमय्या यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मुश्रीफांवर हल्ला चढवल्यानंतर पुन्हा एकदा या वादामध्ये नव्याने फोडणी मिळाली आहे. ही परिस्थिती एका बाजूला असतानाच समरजितसिंह घाटगे आणि किरीट सोमय्या यांची भेट झाली. उभयंतांमध्ये जवळपास अर्धा तास भेट झाली. मात्र, भेटीचा तपशील समजू शकला नाही. 


मुश्रीफांचा समरजितसिंह घाटगेंवर आरोप 


हसन मुश्रीफ यांनी ईडी कारवाईमागे समरजितसिंह घाटगे असल्याचे म्हटले होते. मागील आठवड्यात बुधवारी ईडी कारवाई सुरु असतानाच त्यांनी एक व्हिडीओ रिलीज करताना म्हटले होते की, कागलमधील भाजप नेता गेल्या चार दिवसांपासून ईडी कारवाई करण्यासाठी दिल्ली वाऱ्या करत होते. त्यामुळे या कारवाईमध्ये कोण आहे याचा अंदाज येतो. 


यानंतर घाटगे यांनीही पत्रकार परिषद घेत मुश्रीफांनी केलेले आरोप फेटाळून लावताना मला किरीट सोमय्यांच्या मागे लपण्याची गरज नाही. पाठीत खंजीर खुपसण्याची आमची प्रवृत्ती नाही, आमच्या ते रक्तात नाही, असा दावा करत पलटवार केला होता. त्यानंतर मुश्रीफ समर्थकांनी पत्रकार परिषद घेत घाटगे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. समरजितसिंह घाटगे फक्त जमिनीच्या तुकड्याचे वारसदार असून, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार हसन मुश्रीफ असल्याचे म्हटले होते. शाहू कारखान्याबाबत आमच्याकडेही माहिती असून आम्ही तोंड उघडल्यास त्यांची पळताभुई थोडी होईल, असा इशारा दिला होता.  


इतर महत्वाच्या बातम्या