Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) मातब्बर नेते आणि कागल विधानसभा मतदारसंघातील दिन दलितांचे कैवारी म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दुसऱ्यांदा कारवाई केल्यानंतर कागल मतदारसंघामधील त्यांच्या समर्थकांमध्ये तसेच मतदारांमध्ये संतापाचा कडेलोट झाला आहे. हे भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. दरम्यान, या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांच्यावर तोफ डागली आहे. चार दिवसापूर्वीच कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीमध्ये छापेमारी करण्यासाठी वाऱ्या केल्या होत्या असा आरोप मुश्रीफ यांनी केला. अशा पद्धतीने नाऊमेद करून गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर छापेमारी सुरू झाली झाल्याचे समजताच सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली. गैबी चौकापासून ते कागलमधील प्रत्येक चौकाचौकात कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. यामध्ये एका वृद्ध महिलेने दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. ती म्हातारी म्हणाली की, भाजपला पाडायचंय आणि मुश्रीफला निवडून आणायचंय. मी पेन्शन नेण्यासाठी आलो आहे. कागल मतदारसंघात मुश्रीफ आणि जनतेचे नाते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी अनेक निराधारांना शासकीय लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुश्रीफांवर संकटे आली त्यावेळी त्यांचे पाठीराखे नेहमीच धावून आले आहेत.
पहिल्यांदा ईडीने कारवाई केली त्यावेळी सुद्धा कागलमधील महिलांनी विराट असा मोर्चा काढला होता. यानंतर आजही असाच प्रकार दिसून आला. अनेक समर्थक त्यांच्या निवासस्थानासमोर जमण्यास सुरुवात झाली. यावेळी त्यांनी भाजपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच कागल आणि कोल्हापूर बंदची हाक दिली. त्याचबरोबर काही समर्थकांनी मुंबईत सोमय्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला.
मुश्रीफांकडून शांततेचं आवाहन
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या मुलीच्या घरावर तसेच नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. मी कामानिमित्त बाहेर असल्याने मला दूरध्वनीवरून कारवाईची माहिती समजली. कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी, अशी मी विनंती करत आहे. कागल बंदची हाक देऊ नये, त्यांना तपासात सहकार्य करावे, अशी मी विनंती करत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य माझ्या कार्यकर्त्यांनी करू नये.
समरजितसिंह घाटगेंवर टीकास्त्र
दुसरीकडे, हसन मुश्रीफ म्हणाले की, चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीला फेऱ्या मारून माझ्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना चारच दिवसात ईडीची कारवाई होणार असल्याचे सांगितले होते हे मी जबाबदारीने सांगतो. अशा प्रकारे नाऊमेद करून गलिच्छ राजकारण सुरु आहे. राजकारणात अशा कारवाई होणार असतील, तर त्याचा निषेधच झाला पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या