कोल्हापूर : अजित पवार भाजपला मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शिंदे गटाची अवस्था सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा ठळकपणे रंगली असतानाच त्याचे थेट पडसाद आज कोल्हापुरात उमटले. 


कोल्हापुरात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचे काम अडवल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये चांगलेच घमासान झाले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शाब्दिक चकमक झाली. अजित पवार गटाला सोबत घेऊन अडचण झाल्याचा आरोपही राजेखान जमादार यांनी केला. यावेळी पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारण्यात आला. 


जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी संबंधित अधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोर आणत काम कोणी थांबवलं आहे हे जाहीरपणे सांगावे अशी मागणी केली. ते म्हणाले की, अडवून ठेवण्यात आलेल्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जून महिन्यात टेंडर निघाले आहे, पण ठेकेदाराच्या मर्जीसाठी वर्क ऑर्डर देत नाहीत, असं काम चालणार नाही. अन्यथा, पीडब्ल्यूडीला xxx करु. अजित पवार गट सत्तेत सहभागी करून घेतल्याने अडचण होत असल्याचा आरोपही राजेखान जमादार यांनी केला. फक्त इथंच नाही, तर कागलमध्ये अडचण होत आहे. सरळ त्यांचे नाव सांगतात. टेंडर रद्द करण्यास सांगण्यात आले, पण केलेलं नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे जमादार म्हणाले. विकासकामासाठी निधी आणला म्हणून जाहिरात करणाऱ्यांनी टेंडर रद्द करण्यासाठी कसं सांगतात? असा सवाल त्यांनी केला. 


नेमका वाद कशावरून झाला? 


जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कागल मतदारसंघातील एका रस्त्याचे कामांचे टेंडर खासदार संजय मंडलिक यांच्या पत्रामुळे बजेटमधून मंजूर झालं. त्या कामाचे टेंडरही निघाले होते. यानंतर प्रक्रिया होऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्याची वर्क ऑर्डर देण्यात येणार होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर नेत्याच्या सांगण्यावरून देण्यास टाळाटाळ केली. दुसऱ्या ठेकेदाराच्या मर्जीसाठी ही टाळाटाळ केली. देतो म्हणून सांगूनही आता संबंधित नेत्याला भेटून या, असे अधिकारी सांगत आहेत, त्याशिवाय देणार नाहीत म्हणत आहेत. नियमानुसार प्रक्रिया केली असताना भेटाभेटी कशासाठी? ही पद्धत चुकीची आहे. विकासकामात अडथळा आणू नये. नातेवाईकांच्या ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे काम टाळाटाळ करत आहेत. पालकमंत्र्यांनी सुद्धा काम द्या म्हणून सांगितलं आहे. संजय मंडलिकांनी काम काढल्यानंतर यांच्याकडून (मुश्रीफ गटाकडून) आडवं पडण्याचा काम सुरु आहे. संजय मंडलिक लोकांना त्रास देत नाहीत, पण यांच्याकडून अडवणूक सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या