Gokul Politics Over Debenture: गोकुळमध्ये डिबेंचर मुद्दा (Gokul debenture issue) चांगलाच तापला आहे. 40 टक्के रक्कम कट केल्याच्या मुद्द्यावरून काल (16 ऑक्टोबर) विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात गोकुळच्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी जनावरे थेट गोकुळ कार्यालयामध्ये घुसवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली. दरम्यान, 'डिबेंचर'वरून मोर्चा निघाल्यानंतर आता गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गोकुळवर काढण्यात आलेला मोर्चा हा आमच्या काळजाला ठेच असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
मोर्चा आमच्या काळजाला ठेच (Hasan Mushrif on Debenture)
मुश्रीफ यांनी सांगितले की म्हशी आणि गाईच्या दुधात एक रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ एक आक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. सत्तेत आल्यापासून 15 रुपयांची दरवाढ आम्ही शेतकऱ्यांना दिली. पशुखाद्यामध्ये 50 रुपये कमी केले. ज्यांनी 32 वर्ष सत्ता ठेवली त्यांच्या सुनबाई कालच्या मोर्चाचे नेतृत्व करत होत्या. आपण सत्तेत असताना डिबेंचर सुरू केलं. त्यांनी विरोध करणं ही भूमिका योग्य नसल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. गोकुळमध्ये जो मोर्चा निघाला तो आमच्या काळजाला ठेच असल्याचे त्यांनी सांगितले. डिबेंचरचा अभ्यास करून शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेऊन त्या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. विनाकारण गैरसमज होईल असं काही करू नका, पुढीलवेळी हा मुद्दा येणार नाही याची काळजी घ्या असं त्यांनी सांगितले. संकलन 25 लाख लिटर झाले पाहिजे याबाबत प्रयत्न करा, असे ते म्हणाले.
आम्ही कुणाचा जावई मोठा करण्याचा प्रयत्न केला नाही (Satej Patil on Debenture)
दरम्यान, सतेज पाटील यांनी सुद्धा डिबेंचर मुद्द्यावरून टोला लगावला. ते म्हणाले की गाय आणि म्हशीच्या दूध दरात वाढ करून आम्ही शेतकऱ्यांना मदत केली आहे. गोकुळ शेतकऱ्यांचा राहावा, एकट्याच्या ताब्यात राहू नये असं काम केलं असल्याचे सांगत त्यांनी महाडिकांना टोला लगावला. आम्ही कुणाचा जावई मोठा करण्याचा प्रयत्न केला नाही. शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे. डिबेंचरबाबत कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यात पुन्हा डिबेंचरचा मुद्दा येणार नाही याची काळजी घेऊ असे ते म्हणाले. संचालक बोर्डाच्या या मुद्द्यावर सह्या केल्या त्यांचे नाव सुद्धा जाहीर करा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. संचालक बोर्डात एक भूमिका घ्यायची आणि बाहेर एक भूमिका घेतली जाते असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या