Dhananjay Mahadik on Gokul: जिल्ह्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) निवडणुकीचा धुरळा आता अधिकृतपणे उडायला सुरुवात झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या समर्थकांचा आणि ठरावधारकांचा मेळावा घेत थेट सतेज पाटील गटाला आव्हान दिले. "गोकुळमध्ये महाविकास आघाडीचा एकही संचालक निवडून येणार नाही," असा निर्धार व्यक्त करत महाडिकांनी कार्यकर्त्यांना 'आरपारच्या' लढाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
सतेज पाटलांना आव्हान
मेळाव्याला संबोधित करताना खासदार महाडिक म्हणाले की, "आम्ही गोकुळचे 25 वर्षे नेतृत्व केलं आहे. आमचा अनुभव दांडगा असून आमची विचारांची माणसे आजही ठाम आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कारभाराला कंटाळलेले, अडचणीत आलेले अनेक संस्थाचालक आमच्या संपर्कात आहेत. आता वेळ आली आहे या सत्तेला खाली खेचण्याची."
ठराव गोळा करण्यासाठी 'साम, दाम, दंड, भेद'
निवडणुकीत विजयाची पहिली पायरी म्हणजे 'ठराव'. हेच ओळखून महाडिकांनी कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेण्यास सांगितले. "जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी जीवाचे रान करावे. प्रसंगी साम, दाम, दंड आणि भेद या सर्व मार्गांचा अवलंब करा, पण ठराव आपल्याकडेच आले पाहिजेत," असे आदेश त्यांनी दिले.
काँग्रेस-मविआ: आमचा एकमेव शत्रू
या निवडणुकीत महायुती एकसंधपणे उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत महाडिकांनी दिले आहेत. "काँग्रेस आणि महाविकास आघाडी हा आपला या निवडणुकीतील एकमेव शत्रू आहे. त्यामुळे त्यांच्या ठरावांवर तुटून पडा. विरोधकांचा सुपडा साफ होईल इतके काम आपल्याला तळागाळात करायचे आहे. महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
