Satej Patil on Gokul : गोकुळ संचालिका शौमिका महाडिक  (Shoumika Mahadik on Gokul) यांनी 'गोकुळ'च्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा इशारा दिल्यानंतर चौकशीचे आदेश निघाले आहेत. यानंतर आता आमदार सतेज पाटील यांनी (Satej Patil on Gokul) गोकुळचे केवळ दोन वर्ष कशाला, 25 वर्षांचे लेखापरीक्षण करा, अशी मागणी केली आहे. गोकुळच्या चौकशीवरून सतेज पाटील यांनीही मागील चौकशीची मागणी केल्याने सतेज पाटील आणि महाडिक गटात कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. 


सतेज पाटील यांनी गोकुळमधील चौकशीच्या आदेशावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम्ही ठरवलं असतं तर गोकुळ बरोबर राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. आम्ही सत्तेचा वापर करून कुणावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही. केवळ दोन वर्षांची कशाला 25 वर्षांचा लेखापरीक्षण करायला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी काँग्रेसचेच केदार दुग्धविकास मंत्री होते. त्यामुळे आम्ही ठरवलं असतं, तर गोकुळ बरोबर राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. 


10 दिवसांत गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण करण्यात यावे 


दरम्यान, गोकुळचे लेखापरीक्षण झाल्यानंतर लेखापरीक्षकांनी संघाचे खरे लेखे उघडकीस आणले नसल्याने चाचणी लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी (Shoumika Mahadik on Gokul) कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार 10 दिवसांत गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण करण्यात यावेत, अशा सूचना लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांना दिल्या आहेत.


गोकुळमधून महाडिकांची सत्ता खालसा


दरम्यान, 'गोकुळ'मधील माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता उलथवून टाकताना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने 21 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. गोकुळमध्ये विरोधी बाकावरुन शौमिका महाडिक यांनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. 


सत्यजित तांबेंना पक्षाने डावललं नाही


दरम्यान, सतेज पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्यावर झालेल्या निलंबन कारवाईवरही भाष्य केले. सत्यजित तांबेंना पक्षाने डावललं नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. कोरा एबी फॉर्म तांबे यांना दिला होता, मग तांबे यांना डावललं असं कसे म्हणता? वरिष्ठांनी तांबेंच्या बाबतीचा निर्णय घेतला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या