Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून निधी मिळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेत 100 कोटी रुपये, कोल्हापूर मनपा क्षेत्रासाठी 100 कोटी व इचलकरंजी मनपा क्षेत्रासाठी 25 कोटी निधी देण्याची मागणी केली.
या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ 25 कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग, ग्रामीण मार्ग तसेच गावांतर्गत असणारे रस्ते तसेच व महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते अत्यंत खराब झाले झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते विकासासाठी लवकरात लवकर निधी देण्यात यावा.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 5 कोटींचा तत्काळ निधी
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना संपर्क करत गणेशोत्सवापूर्वी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी 5 कोटींचा निधी सुद्धा तत्काळ मंजूर करण्यात आल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूर सांगली रस्त्याची अक्षरश: चाळण, संतप्त ग्रामस्थांचा रुकडीजवळ रास्ता रोको
दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने हे मार्ग मृत्यूचे सापळे झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक भीषण अवस्था कोल्हापूर-सांगली रस्त्याची झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा सुखरुप घरी जाईल की नाही? याची कोणतीही श्वाश्वती नाही, इतकी भयावह अवस्था खड्ड्यांनी करून ठेवली आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या या मार्गावरील गावच्या ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. काल रुकडीजवळ रस्ता अडवत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या रस्त्याकडे लक्ष द्यावे म्हणून रूकडी गावचे माजी सरपंच अमित कुमार भोसले यांनी वारंवार निवेदन देऊनही रस्त्याचे काम झालेलं नाही. रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून हा रस्त्याची डागडूजी करण्यासाठी काल आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी तब्बल दोन तास वाहने रोखून धरली होती. उपायोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.