Kolhapur Circuit Bench: मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे कोल्हापुरात येत्या सोमवारी (18 ऑगस्ट) लोकार्पण होत आहे. तब्बल 42 वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच साकारत असून खंडपीठासाठी एक निर्णायक पाऊल पडलं आहे. 17 ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं मेरी वेदर ग्राऊंडवर उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुद्धा प्रारंभ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 

सर्किंट बेंचचा परिसर उजळला

सीपीआर रुग्णालयासमोर असलेल्या जुन्या कोर्टाच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे. या इमारतीचे कामकाज अंतिम टप्प्यात आलं आहे. सर्व इमारतींची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. कारंजा सुद्धा कार्यान्वित करण्यात आला आहे.  दुसरीकडे, मनपाकडून शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर फुटपाथ स्वच्छता आहे. विद्युत खांबही दुरुस्त करण्यात येत आहे. सर्किट बेंचसमोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलं असून या मार्गावर नो हाॅकर्स, नो पार्किंग झोन करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर पॅचवर्कही करण्यात येत आहे. दुसरीकडे, सर्किट बेंचसाठी स्टाफ सुद्धा नेमण्यात आला आहे. खटल्याची कागदपत्रेही दाखल झाली आहेत. इमारतीच्या नुतनीकरणासाठी गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर काम सुरु आहे. सर्व कामकाज अंतिम टप्प्यात आलं आहे. इमारतीच्या प्रांगणातही क्राॅकिट करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्किंट बेंचचा परिसर उजळून गेला आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तयारीचा आढावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला. यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांवर चर्चा झाली असून, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि अतिथींच्या सोयी-सुविधांवर विशेष भर देण्यात आला. यावेळी अतिरीक्त पोलीस आयुक्त धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

प्रत्येक ठिकाणी विभागवार पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत सर्किट बेंच इमारत, कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण, शासकीय विश्रामगृह आणि इतर निवासस्थाने यांच्याशी जोडलेल्या रस्त्यांचा तसेच सुरक्षाविषयक बाबींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व विभागप्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की, कार्यक्रमाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची धावपळ होऊ नये यासाठी पूर्वतयारी करावी. विशेषतः, कोल्हापूर जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यांतून येणाऱ्या वकिल, न्यायालयीन अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची संख्या मोठी असल्याने वाहनतळ व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. प्रत्येक ठिकाणी विभागवार पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, यामुळे वाहतुकीची कोंडी टाळता येईल असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी येडगे यांच्या आदेशानुसार प्रत्येक बाबनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये विविध विभागांचे अधिकारी समाविष्ट असून, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी दररोज संबंधित ठिकाणी भेटी देऊन कामांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सुरक्षितता समिती कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि रस्त्यांवर पोलिस बंदोबस्ताची तपासणी करेल, तर वाहतूक समिती पार्किंग आणि रस्ते व्यवस्थेची जबाबदारी सांभाळेल. निवास व्यवस्था समिती अतिथींच्या राहण्याच्या सोयींची खातरजमा करेल.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, हा कार्यक्रम केवळ कोल्हापूरसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन निर्दोष आणि सुरळीत व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. त्यांनी पुढे सांगितले की, कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, वरिष्ठ अधिकारी, वकिल संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने कोणत्याही छोट्या चुकीला वाव देणार नाही. या आढावा बैठकीत पोलिस विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी आपापल्या विभागातील तयारीबाबत माहिती दिली.

इतर महत्वाच्या बातम्या