Kolhapur Municipal Corporation: राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी रणधुमाळी झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी वारे वाहू लागले आहेत. पुढील 15 दिवसांमध्ये महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आता राजकीय पक्षांकडून सुद्धा युती आघाड्यांसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहेत. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीमध्ये फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून महायुतीमध्ये तणातणी असताना जागा जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.
कोल्हापुरात महायुतीत कोणाला किती जागा?
कोल्हापूर मनपासाठी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. हा फॉर्म्युला स्थानिक पातळीवर ठरला असून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे आता लक्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एकूण 20 वाॅर्ड निश्चित झाले आहेत, तर 81 नगरसेवक असेल. 20 व्या क्रमांकाच्या वाॅर्डमध्ये पाच नगरसेवक असतील. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांवरून वाद रंगला आहे.शिवसेनेकडून माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरूच आहे.
माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरुच
दोन दिवसापूर्वी काँग्रेसला शिवसेनेकडून आणखी एक हादरा देण्यात आला. माजी महापौर सई खराडे यांनी आपल्या मुलासह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटामध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.
महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फॉर्म्युला ठरला
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फॉर्म्युला ठरला असून तिन्ही पक्ष एकत्रित लढतील असे चित्र आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील यांच्यावर प्रचाराची धुरा असणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. महायुतीकडून राजेश क्षीरसागर आणि खासदार धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रचाराची धुराा असणा आहे. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ असतील.
इतर महत्वाच्या बातम्या