Ulhas Patil : शिवसेनेतील बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने तसेच एकमेव आमदार प्रकाश आबिटकर तसेच माजी आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाच्या गळाला लागले.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना माजी आमदार काय करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. माजी आमदार उल्हासदादा पाटील यांचीही तळ्यातमळ्यातील चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती. मात्र, शिवसेनेला मिळालेलं नवं नाव आणि चिन्हानंतर उल्हास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी वतन पठाण, नेताजी संकपाळ उपस्थित होते.
या भेटीमुळे उल्हासदादा पाटील शिवसेनेसोबत राहू मशाल हाती घेण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ऑगस्ट महिन्यात कोल्हापूरमधील बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी उल्हास पाटील यांचाच हा मतदारसंघ असल्याचे सांगितले होते. तसेच व्यासपीठावरही बाजूला स्थान दिले होते.
करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याकडे त्यांनी पाठ फिरवली होती. माजी आमदार सुजित मिणचेकर यांची मात्र अजूनही तळ्यात-मळ्यात अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या घरी सुजित मिणचेकर उपस्थित राहिले होते.
त्यामुळे सुजित मिणचेकर हे शिंदे गटात जाणार का? याची चर्चा रंगली. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातही सुजित मिणचेकर दिसून आल्याने ते अजूनही द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे सत्यजित पाटील सरूडकर, माजी आमदार सुरेश साळोखे हे ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या