Hasan Mushrif : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमवेत लवकरच वेळ घेऊन भेटणार असल्याचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटले आहे. या भेटीमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत सर्व ती माहिती देऊन त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करणार असल्याचे, त्यांनी पत्रकात म्हटले आहे. केडीसीसी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील 10 ते 15 लाख शेतकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण देत असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.


पुण्यामध्ये बोलताना अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये सोलापूर, नागपूर आणि कोल्हापूर अशा तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर प्रशासक नेमावा लागल्याचा उल्लेख केला आहे. कदाचित यापूर्वी बँकेवर प्रशासक नेमला होता, या संदर्भाने त्यांचे ते वक्तव्य असावे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 


कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीची छापेमारी 


या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील 'गोडसाखर'ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी (KDCC ED Raid) केली होती. यावेळी तब्बल 30 तास छापेमारी केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची 70 तासांनी ईडीने सुटका केली होती. 


माजी संचालकांची सुद्धा चौकशी 


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापेमारी केल्यानंतर (KDCC ED Raid) ईडीकडून आणखी तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे या तिघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणाऱ्या ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणात ही चौकशी झाल्याचे समजते. कर्ज प्रकरणातील सहभागी सर्जेराव पाटील, अनिल पाटील आणि विलास गाताडे या तिघांना समन्स बजावून मुंबईत ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. दरम्यान, बँकेच्या मागील संचालक मंडळातील या कर्जप्रकरणाशी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :