Kolhapur Fire: कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील (Kolhapur Fire Latest Updates)  सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.  कोल्हापूर शहराला (Kolhapur City) लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही. 


दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचे समजते. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्याने इतर कंपन्यांकडे आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.


दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीवर साडे चार वाजेपर्यंतही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे अग्नीशमन दलाकडून बंबच्या बंब रिकामे करत आहेत. घटनास्थळी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर मनपा, विमानतळ, एमआयडीसीमधील अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीत केमिकलचे बंब असल्याने आग नियंत्रणात येताना अडचणी येत आहेत.


आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तैनात 


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या प्रयत्न करत आहेत. Ceraflux कंपनीच्या Thermochem युनिट दोनमध्ये ही आग लागली आहे. आग नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांकडून आग लागलेल्या परिसरात कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलिसांकडून 200 मीटर अंतरावरूनच बघ्यांना बाजूला करत आहेत. कंपनीतील आग लागून असलेल्या कंपन्यांमध्ये पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरून आगीचे लोट दिसत असल्याने बघ्यांची गर्दी वाढू लागली आहे. कंपनीत आग लागल्याचे समजताच कर्मचारी तत्काळ बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


आग लागलेल्या कंपनीचं Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं आहे.  आग लागलेल्या कंपनीच्या शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी असल्यानं मोठा धोका आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


ही बातमी देखील वाचा


PHOTO: कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट- पाहा थरारक दृश्य